File Photo : Construction
गेल्या तीन दिवसांपासून भारतीय शेअर बाजाराने घसरणीची मालिका कायम ठेवली आहे. आजही शेअर बाजार बंद होताना घसरणीसह बंद झाला आहे. मात्र, असे असतानाही सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनी पटेल इंजिनीअरिंगच्या शेअरने आज दमदार कामगीरी केली आहे. आज कंपनीचा शेअर शेअर ७ टक्क्यांनी वधारून ५७.२५ च्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे शेअर्समध्ये ही वाढ होण्याचे कारण कंपनीला मोठी ऑर्डर आहे. कंपनीने शेअर बाजारात दिलेल्या माहितीनुसार, पटेल इंजिनीअरिंगच्या संयुक्त उपक्रमाला महाराष्ट्र सरकारकडून ३१७ कोटी रुपयांचा प्रोजेक्ट मिळाला आहे.
मिळाली ३१७.६० कोटींची वर्क ऑर्डर
पटेल इंजिनिअरिंग आणि त्यांच्या जॉईंट व्हेन्चरला जिगांव प्रकल्पाच्या क्षेत्रातून पहिल्या टप्प्यासाठी वॉटर लिफ्टिंगच्या व्यवस्थेच्या निर्मितीशी निगडीत कामासाठी ३१७.६० कोटींची ऑर्डर मिळाली असल्याची माहिती कंपनीने शेअर बाजारातील एक्सचेंज फायलिंगमध्ये दिली आहे. या संयुक्त उपक्रमात कंपनीचा हिस्सा ३५ टक्के असणार आहे. या कंत्राटात पटेल इंजिनीअरिंगचा वाटा ११६.१६ कोटी रुपये आहे. हा प्रकल्प कंपनीला पुढील २४ महिन्यांत पूर्ण करायचा आहे.
हेही वाचा : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; गुंतवणूकदारांचे 1.57 लाख कोटींचे नुकसान!
कंपनीकडून अनेक प्रकल्पांचे दर्जेदार काम
१९४९ मध्ये स्थापन झालेल्या पटेल इंजिनीअरिंगची जलविद्युत, सिंचन, बोगदे आणि जलविद्युत आणि धरण प्रकल्पांच्या भूमिगत कामांमध्ये भक्कम उपस्थिती असून, कंपनीने अनेक प्रकल्पांचे दर्जेदार काम केले आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील प्रकल्पांच्या अंमलबजावणीत कंपनीचा रेकॉर्ड उत्तम आहे. कंपनीने ८५ हून अधिक धरणे, ४० जलविद्युत प्रकल्प आणि ३०० किलोमीटरपेक्षा जास्त बोगदे पूर्ण केले आहेत, ज्यात बहुतांश केंद्रीय सार्वजनिक उपक्रम किंवा राज्य सरकारच्या संस्था आहेत.