अवघ्या सहा हजार रूपयांपासून सुरु केला बिझनेस; आज 5 कोटींच्या कंपनीचा आहे मालक!
नोकरी सोडून आपणही बिझनेस करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. ज्या व्यक्तीच्या अंगी जिद्द आणि चिकाटी असते, ती व्यक्ती तिची प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकते. मात्र त्यासाठी गरज असते एका चांगल्या बिझनेस आयडियाची. याच सर्व गोष्टी ध्यानात ठेऊन अंकित रॉयने त्याच्या कोट्यवधींचा बिझनेस सुरु केला आहे.
अंकितवर एक वेळ अशी आली होती की, आईच्या आजारपणामुळे त्याला नोकरी सोडावी लागली होती. मात्र याच नंतर त्याच्या डोक्यात स्टार्टअपची कल्पना आली. आईच्या निधनानंतर अंकित डिप्रेशनमध्ये गेला होता. इतकेच नाही तर त्याला पार्टनरनेही धोका दिला. स्टार्टअप सुरु करण्यासाठी त्याने ज्या गुंतवणूकदाराकडे मदत मागितली होती. त्याने देखील त्याला नकार दिला. मात्र, तरीही अंकितने हार मानली नाही आणि आता त्याने ५ कोटींची कंपनी उभारली आहे.
शक्तिस्टेलर नावाची कंपनी उभारली
अंकित मूळचा मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून आहे. त्याने शक्तीस्टेलर कंपनी सुरू केली, जी सौर पॅनेल बसवते. आता त्यांची कंपनीचे काम आता वाढताना दिसत आहे. 2009 मध्ये भोपाळच्या राजीव गांधी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्समध्ये बी.टेक पूर्ण केल्यानंतर अंकितला मुंबईत नोकरी मिळाली होती. पाच वर्षे मुंबईत काम केल्यानंतर त्याच्या आईला कॅन्सरचे झाल्याचे निदान झाले. तो उपचारासाठी भोपाळला आला आणि त्याला नोकरी सोडावी लागली.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
पुन्हा नोकरी मिळू शकली नाही
अंकितला भोपाळ किंवा आसपास नोकरी मिळेल अशी आशा होती. पण त्यावेळी त्याला नशीबाने साथ दिली नाही. मुंबईत त्याला जेवढा पगार मिळत होता तो भोपाळमध्ये मिळत नव्हता. त्यामुळे अंकित तब्बल दोन वर्ष बेरोजगार होता. यानंतर त्याने स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत असताना सौर ऊर्जेचा व्यवसाय वाढणार याची त्याला कल्पना होती. सोलर पॅनल बसवण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार त्याच्या मनात आला.
२०१८ मध्ये बनवली कंपनी
अंकितने 2018 मध्ये स्टार्टअप सुरू केले. मात्र त्यावेळी त्याच्याकडे पैसे कमी होते. पण त्याने व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. पहिली ऑर्डर अंकितला त्याच्या वडिलांच्या मित्राने दिली. अंकितने त्याच्या जागेवर सोलर पॅनल बसवून ६,००० रुपये कमावले होते. मात्र तरीही दुर्देव त्याची पाठ सोडत नव्हते. काम सुरू होताच त्याच्या आईचे निधन झाले. या काळात त्याच्या पत्नीने त्यांची काळजी घेतली. तो डिप्रेशनमध्ये होता आणि त्यातून बाहेर पडायला तब्बल अर्ध्या वर्षाचा कालावधी गेला.
काही व्यक्तींनी धोकाही दिला
अंकितला दुसरी ऑर्डर मिळाली. मात्र यामध्ये त्याला काही व्यक्तींनी धोका दिला. या ऑर्डरसाठी त्याने सगळा माल घेतला होता, पंरतु ऐनवेळी त्याला नकार मिळाला. अंकितने ती यंत्रणा त्याच्या घरीच बसवली. एकट्याने व्यवसाय करणे सोपे नसल्याने त्याने ज्युनियरला त्याचा जोडीदार होण्यास सांगितले. मात्र तो दीड लाख रुपये घेऊन पळून गेला.
आज ५ कोटींच्या कंपनीचा मालक
गुंतवणुकीसाठी तयार असलेल्या त्याच्या मित्रामार्फत तो एका व्यक्तीला भेटला. पण नंतर त्यांनीही माघार घेतली. यानंतर अंकितला प्रवीण नावाची व्यक्ती भेटली. आता प्रवीण त्याच्या कंपनीत मार्केटिंग हाताळतो. आता शक्तीस्टेलर ही कंपनी खूप चांगली चालत असून, गेल्या वर्षीची कंपनीची उलाढाल तब्बल 3 कोटी रुपये होती. ती यंदा 5 कोटी रुपयांवर पोहोचू शकणार आहे.