सौजन्य - नवराष्ट्र टीम
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार प्रमोद प्रकाश नवले (रा. लक्ष्मीनगर, निंबूत, ता. बारामती, जि. पुणे) हा बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. कारवाईदरम्यान ३ लोखंडी बॅरलमध्ये कच्चे रसायन, जमिनीत खोदलेल्या खड्ड्यात साठवलेले कच्चे रसायन, २ प्लास्टिक टाक्या, २४ नग (प्रत्येकी ३५ लिटर क्षमतेची) हातभट्टी गावठी दारू, ४ विद्युत मोटार पंप तसेच इतर साहित्य असा एकूण ३,५९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल (पुणे ग्रामीण), अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर दारू निर्मितीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
‘एएनटीएफ’चा जोरदार धडाका
राज्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीला आणि सेवनाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्सने (एएनटीएफ) अल्पावधीतच कात टाकत धडाकेबाज कामगिरी बजावण्यास सुरूवात केली आहे. राज्यभरात पथकाने काही महिन्यांत तब्बल २१ गुन्हे उघडकीस आणले असून, ४४ आरोपींना अटक देखील केली आहे. या कारवाईत अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात हे टास्क फोर्स ड्रग्ज तस्करांसाठी ‘काळ’ बनणार आहे.






