...हा तर चिखल फेकण्याचा प्रयत्न, आरोपांमध्ये नाही दम; हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालावर तज्ज्ञांची प्रतिक्रिया!
हिंडनबर्ग रिसर्चने नवीन अहवाल जारी करत सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बूच यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अदानी समूह प्रकरणात माधवी पुरी बूच यांनाही गोवण्यात आले आहे. त्यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. विशेष म्हणजे या अहवालावर सेबीच्या प्रमुख माधवी बूच आणि अदानी समूहाची देखील प्रतिक्रिया आली आहे. अशातच आता शेअर बाजारातील तज्ज्ञांनी देखील पुढे येत समाजमाध्यमांवर आपली प्रतिक्रिया शेअर करणे सुरु केले आहे. ज्यात हा केवळ चिखल फेकण्याचा प्रयत्न असून, हिंडनबर्ग आरोपांमध्ये दम नसल्याचे म्हटले आहे.
काय म्हटलंय नीलेश शाह यांनी?
“प्राचीन काळी ऋषी-मुनी तप करायचे, त्यावेळी त्यांचा यज्ञ अपवित्र करण्यासाठी काही राक्षस पुढे यायचे. हिंडनबर्ग हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. समोरच्याची प्रतिमा मलिन होईल, हा उद्देश ठेवूनच त्यांच्यावर चिखल फेकला जात आहे. सुदैवाने सध्याच्या काळात सोशल माध्यमे वापरात असल्याने, लोकांना खरे काय ते लगेच कळते.” असे कोटक महिंद्रा ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शाह एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये हिंडेनबर्ग रिसर्चच्या नवीन अहवालावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. दरम्यान, हिंडनबर्ग रिसर्चने मागील वर्षी जानेवारी महिन्यात याप्रकरणात कोटक महिंद्रा बँकेचे देखील नाव गोवले होते.
हिंडनबर्ग अहवाल हा बदनामीकारक
भारताचे माजी आर्थिक सल्लागार केव्ही सुब्रमण्यम यांनी देखील या प्रकरणात उडी घेत, समाजमाध्यमांवर आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे. त्यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे की, “हिंडनबर्ग अहवाल हा बदनामीकारक आहे. सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी यांना मी गेल्या दोन दशकांपासून ओळखतो. त्यांची जगभरातील ख्याती, इमानदारी आणि बौद्धिक क्षमता पाहता मला पूर्ण विश्वास आहे की, त्या या संपूर्ण प्रकरणाला पुरून उरतील.”
केव्ही सुब्रमण्यम यांनी भगवान उवाच ऑफिस नावाच्या ‘एक्स’ हँडलची एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, या युजरचा संदर्भ पाहून लक्षात येते की, कशा पद्धतीने हिंडनबर्गचा नवीन अहवाल हा बदनामीकारक आहे. दरम्यान, केव्ही सुब्रमण्यम यांनी यापूर्वीही दीड वर्षांपूर्वी अदानी समूहावर हिंडनबर्गकडून करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
I’ve personally known SEBI Chairperson Madhabi for about two decades. Given her unimpeachable integrity and her intellectual prowess, I’m sure she will shred to smithereens this Hindenberg hit job.
In this wonderful thread by @BhagwaanUvacha on the report, the bottom line is in… https://t.co/yYuOkRLZuX— Prof. Krishnamurthy V Subramanian (@SubramanianKri) August 11, 2024
‘अदानी हे तर माध्यम, भारतीय अर्थव्यवस्थेवर निशाणा’
“हिंडनबर्ग रिसर्च भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती पाहून, त्यास ढेपाळण्याचा वारंवार प्रयत्न करत आहे. ज्यात अदानी समूह हे केवळ माध्यम म्हणून वापरले जात आहे. हिंडनबर्ग रिसर्चचा खरा निशाणा हा भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय शेअर बाजारावर आहे. हा अहवाल भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी मोठे आव्हान आहे. केंद्र सरकारने पुढे येऊन अशा प्रकरणावर कारवाई करण्याची गरज आहे.” असे व्हॉईस ऑफ बँकिंगच्या संस्थापक अश्विनी राणा यांनी हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.