वायगाव हळद पोहोचणार आता सातासमुद्रापार, ईफ़िक्कीच्या पुढाकाराने सर्वोत्तम हळद आता दिसणार जागतिक बाजारात (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Waigaon Turmeric Marathi News: समुद्रपूर तालुक्यातील वायगाव येथील हळदीला भौगोलिक मानांकन जीआय टॅग क्रमांक ४७१ प्राप्त झाला आहे. हे मानांकन 2016 मध्ये वायगाव हळद शेतकरी उत्पादक कंपनी लि. गिरड, ता. समुद्रपूर यांनी प्राप्त केले आहे. वायगाव परिसरात पिकणाऱ्या हळदीच्या विशिष्ट औषधी गुणधर्मांमुळे तिला हे मानांकन मिळाले आहे. विदेशात या हळदीला मागणी असून, जिल्ह्यातील वायगाव हळद पहिल्यांदाच दुबई येथे निर्यात करण्यात येणार आहे.
भारतीय पारंपरिक कृषी वारसा जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलत, जीआय-टॅग वायगाव ताजी हळद दुबईला निर्यात करण्यासाठी ९ मे २०२५ रोजी नागपूर विमानतळावर फ्लॅग-ऑफ समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
ही ऐतिहासिक निर्यात ईफ़िक्की, आत्मा, अपेडा, यूनिवर्स एक्सपोर्ट्सच्या पुढाकाराने वायगाव हळद पोहोचणार आता सातासमुद्रापार, सर्वोत्तम हळद आता जागतिक बाजारातही दिसणार. ही हळद दुबईतील Our Wellness Village DMCC या आरोग्य केंद्राच्या सहकार्याने दुबईला पोहोचवली जाणार असून, ती तेथे किरकोळ आणि आरोग्य प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केली जाणार आहे.
एक्सिम फार्मर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (EFICCI), आत्मा, अपेडा, कृषि विभाग यांच्या सहयोगाने यूनिव्हर्स एक्सपोर्ट्सच्या माध्यमातून वायगांव हळद उत्पादक कंपनी, विदर्भ नैसर्गिक शेतकरी उत्पादक कंपनी, कृषोण्णति उत्पादक कंपनी कडून १५० रुपये प्रति किलोच्या भावाने हळदीची खरेदी करण्यात आली आहे, जो बाजारपेठेच्या तुलनेत तिप्पट दर आहे.
वायगावची हळद गडद पिवळ्या म्हणजेच केशरी रंगाकडे झुकलेली असते. इतर हळदीच्या तुलनेत आकर्षक रंग आणि उच्च कर्क्युमिन प्रमाण (6%). औषधी गुणधर्म आणि समृद्ध सुगंध यामुळे या हळदीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे, हळदीची पावडर मऊ, बारीक आणि अत्यंत शुद्ध असते. पारंपरिक पद्धतीने उत्पादन होत असल्याने रासायनिक मुक्तता.
या निर्यातीमध्ये कृषिन्नोती शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड, विदर्भ नैसर्गिक शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड आणि वायगाव हळद शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड यांनी सहभाग घेतला आहे. ओल्या हळदीची निर्यात दुबईला करण्यात येत असून, येत्या काळात निर्यात वाढल्यास शेतकऱ्यांना अधिक आर्थिक फायदा होईल.
वर्धा जिल्हा हा महाराष्ट्रातील एक प्रमुख हळद उत्पादक जिल्हा आहे. समुद्रपूर तालुक्यात सुमारे 160.40 हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड केली जाते. वार्षिक उत्पादन 561.40 मेट्रिक टन आहे.
वायगाव हळदीच्या निर्यातीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत आपला ठसा उमटवण्याची संधी मिळणार आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.