फोटो सौजन्य - Social Media
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना केसगळतीचा त्रास जाणवत आहे. दररोज थोडेसे केस गळणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी केस गळती सातत्याने वाढत असेल किंवा डोक्यावरील केस पातळ होत असल्याचे जाणवत असेल, तर ती चिंतेची बाब ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, ही समस्या शरीरातील काही बदल, चुकीच्या सवयी किंवा आरोग्याशी संबंधित कारणांकडे सूचक असू शकते. मात्र योग्य वेळी कारण ओळखून उपाय केल्यास केसगळती नियंत्रणात आणणे शक्य आहे.
अशुअर क्लिनिकचे संस्थापक आणि त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अभिषेक पिलानी यांनी केसगळती कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या आणि व्यवहार्य सूचना दिल्या आहेत. त्यांच्या मते, कोणतेही चमत्कारी उपाय न करता दैनंदिन सवयींमध्ये सुधारणा केल्यास केसांचे आरोग्य सुधारू शकते.
दररोज साधारण ५० ते १०० केस गळणे हे सामान्य मानले जाते. केस वाढ, विश्रांती आणि गळती अशा टप्प्यांतून जातात. ऋतुबदल, आजारपण किंवा मानसिक तणावामुळे काही काळासाठी केसगळती वाढू शकते. मात्र ही गळती दीर्घकाळ टिकत असेल, अचानक वाढत असेल किंवा केसांची घनता कमी होत असेल, तर वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
केसांची चुकीची निगा ही केसगळतीमागील एक मोठी कारणे ठरू शकते. ओले केस जोरात विंचरणे, घट्ट वेण्या किंवा पोनीटेल बांधणे, टॉवेलने जोरात पुसणे यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात. ओले केस अधिक नाजूक असल्याने रुंद दातांच्या कंगव्याने हळूवार विंचरणे अधिक सुरक्षित ठरते.
केस धुण्याच्या सवयींबाबतही अनेक गैरसमज आहेत. किती वेळा केस धुवायचे हे प्रत्येकाच्या टाळूच्या प्रकारावर अवलंबून असते. तेलकट टाळूसाठी नियमित केस धुणे आवश्यक असते, तर कोरड्या टाळूसाठी कमी वेळा केस धुणे योग्य ठरते. मात्र सौम्य आणि टाळूसाठी सुरक्षित शॅम्पू वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. टाळूवर साचलेली घाण, तेल आणि घाम केसगळती वाढवू शकतात. कंडिशनर नेहमी केसांच्या टोकांना लावावे, थेट टाळूवर नाही.
केसांचे आरोग्य आहाराशी थेट जोडलेले आहे. प्रथिने, लोह, व्हिटॅमिन डी आणि बी-कॉम्प्लेक्स यांची कमतरता असल्यास केस गळती वाढते. अचानक डाएट बदलणे, उपासमार किंवा असंतुलित आहाराचे परिणाम काही महिन्यांनी केसांवर दिसून येतात. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या, डाळी, फळे, बिया, कडधान्ये आणि पुरेसे प्रथिने आहारात असणे आवश्यक आहे.
मानसिक तणावाचाही केसांवर मोठा परिणाम होतो. सततचा ताण केसांच्या मुळांना विश्रांतीच्या अवस्थेत ढकलतो, ज्यामुळे काही आठवड्यांनंतर केस गळू लागतात. पुरेशी झोप, नियमित व्यायाम, ध्यानधारणा यामुळे तणाव नियंत्रणात ठेवता येतो.
तसेच, वारंवार हेअर स्ट्रेटनिंग, कलरिंग, रिबॉन्डिंग किंवा उष्णतेचा अतिवापर केल्यास केस कमजोर होतात. शक्य असल्यास अशा उपचारांना थोडा विराम देणे फायदेशीर ठरते. कोंडा, बुरशीजन्य संसर्ग किंवा टाळूवरील इतर समस्या दुर्लक्षित करू नयेत.
केसगळती अचानक वाढत असेल, ठिकठिकाणी टक्कल पडत असेल किंवा इतर शारीरिक लक्षणे जाणवत असतील, तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वेळीच तपासणी आणि उपचार केल्यास केसगळतीची समस्या मोठ्या प्रमाणात आटोक्यात आणता येते.






