फोटो सौजन्य- iStock
आज सर्वत्र बाप्पाचे आगमन झाले आहे. महाराष्ट्रात तर पुढील १० दिवस बाप्पामय वातावरण असणार आहे तसेच देशभरात हा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो. या गणेशोत्सवामध्ये सर्वत्र आनंद उत्साहाचे वातावरण असते. हे वातावरण बाजारामध्ये ही दिसणार आहे. कॅट (कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ) अहवालानुसार गणेशोत्सव काळात तब्बल 25 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होणार आहे. हा सण व्यावसायिकांसाठी शानदार असणार आहे. स्थानिक उत्पादन खरेदीवर ग्राहकांचा मोठा भर असल्याने त्याचा थेट फायदा भारतीय उत्पादकांना होणार आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात सह देशभरात 20 लाख गणेश मंडळ
कॅटनुसार गणेशोत्सव काळात महाराष्ट्र,गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्रपदेश, तेलंगाणा, मध्यप्रदेश या राज्यांसहित इतर राज्यांमध्ये तब्बल 20 लाख गणेश मंडळे आहेत. प्रत्येक मंडळाच्या गणेशोत्सवाचा खर्च 50 हजार रुपये जरी असला तरी हा आकडा 10 हजार कोटीहून जास्त जास्त होतो. मंडप उभारणी, डेकोरेशन इत्यादी घटक यामध्ये सामिल असतील.
मूर्ती आणि पूजा साहित्य
गणेशमूर्तींचा व्यवसाय 500 कोटींपेक्षा जास्त असणार आहे. पूजा साहित्य, हार, फुले, नारळ, अगरबत्ती, धुप, इत्यादींची विक्री 500 कोटी रुपयांहून अधिक असणार आहे. मिठाई आणि घरगुती पदार्थ उत्पादकांच्या उत्पादनाची विक्री 2000 कोटीहून अधिक असणार आहे.गणेशोत्सव काळात अनेक ठिकाणी समारंभ आयोजित केले जातात. त्या समारंभामध्ये खानपानही असते. नाश्ता दिला जातो यामधून 300 कोटी रुपयांचा व्यवसाय होणार आहे. ज्याच्या थेट फायदा छोटे व्यापारी आणि स्थानिक केटरर्स यांना होणार आहे.
गणेशोत्सव प्रवास, कपडे,दागिने
महाराष्ट्रात कोकणामध्ये चाकरमानी लाखोंच्या संख्येने गावी जातात.तसेच राज्य आणि देशातील इतर ठिकाणीही लोक प्रवास करतात. ज्यामुळे पर्यटन व्यवसायाला या गणेशोत्सव काळात कमालीची चालना मिळते. ट्रॅव्हल कंपन्या,वाहतूक सेवा ( बस, ट्रेन,टॅक्सी, स्थानिक वाहतूक) यामध्ये तब्बल 2000 कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल होणार आहे. यातील सर्वात जास्त उलाढाल ही महाराष्ट्रामध्ये होणार आहे. कपडे,दागिने, घरगुती सजावट आणि भेटवस्तूच्या सामानाची उलाढाल ही 3000 कोटी रुपये होऊ शकते. इव्हेंट मॅनेजमेंट कपन्यांनाही या काळात मोठा फायदा होणार आहे.या कंपन्याचा 5000 कोटींचा व्यवसाय केला जाऊ शकतो.
महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त व्यावसायिक उलाढाल होणार आहे. ज्यामुळे व्यापाऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. गणपतीच्या आगमनाने एकंदर बाजारामध्ये नवचैतन्य निर्माण होणार आहे.