भाईंदर – विजय काते : भाईंदर पश्चिम येथील मोदी पटेल मार्गावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेत असताना एका हृदयद्रावक दुर्घटनेत प्रतीक शाह (वय ३४) या तरुण कार्यकर्त्याचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाच्या गंभीर दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मोदी पटेल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे पन्नासावे वर्ष असल्याने उत्सव मोठ्या उत्साहात आणि धामधुमीत साजरा करण्यात आला. मंडळाने परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. झाडांवर आणि रस्त्यांवर विजेच्या केबल्स व तोरणमाळा बांधून विद्युत सजावट करण्यात आली होती. मात्र ही सजावट बेकायदेशीर आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक असल्याचा इशारा नागरिकांकडून व तक्रारींद्वारे प्रशासनाला आधीच देण्यात आला होता.
रात्री सुमारे पावणे आठ वाजता गणेशमूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आली. मंडळाचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीदरम्यान मोदी पटेल रस्त्याच्या नाक्यावर झाडावर बांधलेल्या विद्युत तारेला हात लागल्याने प्रतीक शाह यांना जबर शॉक लागला. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या कार्यकर्त्यासही शॉक बसला, मात्र इतरांनी प्रसंगावधान राखून त्याला बाजूला केले. प्रतीक शाह यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
प्रतीक शाह हे वसंत वैभव इमारतीत राहणारे असून त्यांना पाच वर्षाचा मुलगा आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी ते पत्नीसह गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यांनी आरती केली आणि विसर्जनासाठी मूर्ती ट्रॉलीवर ठेवली. त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली. भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
गणेशोत्सव काळात शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पावसाळी हवामानात अशा प्रकारची सजावट जीवितहानीस कारणीभूत ठरू शकते, याची सूचना अनेक वेळा महापालिका आणि अदानी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. तरीही प्रशासनाने गांभीर्याने विचार न करता दुर्लक्ष केले, अशी नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे.
मुंबईचे मानाचे गणपती गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ! भक्तांच्या मनात शेवटच्या भेटीची आस, जमली अलोट गर्दी
या घटनेनंतर नागरिकांनी महापालिका अधिकारी आणि अदानी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. “जाणीवपूर्वक सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून उत्सवासाठी सजावट करण्यास परवानगी दिली गेली. याचा बळी प्रतीक शाह यांना जावा लागला. प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी”, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
भाईंदर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. विद्युत सुरक्षा नियमांचे पालन न करणे, बेकायदेशीर सजावट आणि संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यावर सखोल चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
परिसरातील नागरिक, गणेशोत्सव मंडळाचे सदस्य आणि स्थानिक समाजप्रतिनिधींनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “उत्सव हा आनंदाचा असतो, पण सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने असा हानीकारक परिणाम घडला”, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
प्रतीक शाह यांच्या आकस्मिक मृत्यूने गणेशोत्सवातील सुरक्षेचे नियम, प्रशासनाची जबाबदारी आणि सार्वजनिक विद्युत सजावट याविषयी गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. तात्काळ चौकशी, दोषींवर कारवाई आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्याची गरज आहे. या दुर्घटनेने उत्सवाच्या उत्साहावर शोकाची छाया निर्माण झाली आहे.