फोटो सौजन्य- iStock
केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ या नव्या योजनेला मंजुरी दिली. या योजनेद्वारे देशभरातील शैक्षणिक आणि संशोधन संस्थांना शास्त्रीय संशोधन लेख आणि जर्नल प्रकाशनांमध्ये प्रवेश मिळणार आहे. तीन वर्षांसाठी म्हणजेच 2025, 2026 आणि 2027 या कॅलेंडर वर्षांसाठी या केंद्रीय योजनेसाठी सुमारे 6,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ योजना उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेतील प्रवेश वाढवण्यासाठी केंद्र सरकारने मागील दशकात घेतलेल्या शैक्षणिक पुढाकारांवर आधारित आहे. देशातील तरुणांना दर्जेदार उच्च शिक्षण उपलब्ध करून देणे आणि संशोधन व नवकल्पनांना प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. यामुळे अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन (ANRF) अंतर्गत संशोधन व विकासाला चालना मिळेल. सरकारी विद्यापीठे, महाविद्यालये, संशोधन संस्थानं आणि प्रयोगशाळांमध्ये संशोधन संस्कृती विकसित होईल.
लाभार्थी आणि संस्था
या योजनेचे फायदे केंद्र किंवा राज्य सरकारच्या व्यवस्थापनाखालील सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना आणि केंद्र सरकारच्या संशोधन व विकास संस्थांना मिळतील. ही योजना इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क (INFLIBNET) द्वारे समन्वित केली जाईल. INFLIBNET हे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) अंतर्गत असलेले स्वायत्त आंतरविद्यापीठ केंद्र आहे.
योजनेचा लाभ 6,300 हून अधिक संस्थांना मिळणार आहे, ज्यामध्ये सुमारे 1.8 कोटी विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधक यांचा समावेश असेल. यामुळे विकसित भारत @2047, राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020, आणि ANRF च्या उद्दिष्टांशी सुसंगत उद्दिष्टांची पूर्तता होईल.
योजनेचे फायदे आणि परिणाम
विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा विस्तार- देशभरातील विद्यार्थ्यांना शास्त्रीय जर्नल्समध्ये सहज प्रवेश मिळेल.
संशोधनाला चालना- या योजनेतून टियर 2 आणि टियर 3 शहरांतील विद्यार्थ्यांना व संशोधकांना दर्जेदार जर्नल्स आणि संशोधन प्रकाशने उपलब्ध होतील, ज्यामुळे मूलभूत आणि बहुविषयक संशोधनाला चालना मिळेल.
संशोधन लेखनास प्रोत्साहन- ANRF भारतीय संशोधन लेखनाचा योगदानाचा आढावा घेऊन वेळोवेळी सुधारणा सुचवेल.
संपूर्ण शैक्षणिक प्रगती- प्रगत तंत्रज्ञान आणि ज्ञानाच्या आधारावर शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक घटकाला फायदा मिळेल.
एकसंध पोर्टलचा वापर
वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजनेअंतर्गत उच्च शिक्षण विभागाने एकसंध पोर्टल सुरू करणार आहे. या पोर्टलद्वारे संस्थांना विविध शास्त्रीय जर्नल्समध्ये प्रवेश मिळेल. हे पोर्टल वापरण्यास सुलभ असेल, ज्यामुळे माहितीचा प्रसार वेगाने आणि प्रभावीपणे होईल.
‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ ही योजना भारतातील विद्यार्थ्यांसाठी, प्राध्यापकांसाठी आणि संशोधकांसाठी ज्ञान, संशोधन आणि विकासाचे नवीन दालन खुले करणार आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाला बळ देत, शास्त्रीय संशोधनासाठी आवश्यक असलेल्या साधनसामग्रीचा प्रवेश सर्वांना सहज मिळेल, ज्यामुळे भारताला संशोधन आणि नवकल्पनांच्या क्षेत्रात नवी उंची गाठता येईल.






