फोटो सौजन्य - Social Media
फिल्मसृष्टीतील झगमगाट, स्टारडम आणि कोट्यवधींचे उत्पन्न पाहता अनेक तरुण अभिनय क्षेत्रात करिअर करायचं स्वप्न पाहतात. पण बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारचा मुलगा आरव कुमारने मात्र या सगळ्यांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षय कुमारने अलीकडेच सांगितले होते की, आरवने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की त्याला अभिनय करायचा नाही.
अक्षय म्हणतो, “आरवला फिल्म इंडस्ट्रीपासून दूर राहायचं आहे. त्याने अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की, त्याला ना अभिनय करायचा आहे, ना घरच्या प्रॉडक्शन हाऊसची जबाबदारी घ्यायची आहे.” अभिनयाऐवजी आरवने फॅशन डिझायनिंगमध्ये आपलं करिअर घडवायचं ठरवलं आहे. तो सध्या लंडनमध्ये फॅशन डिझाइनचं शिक्षण घेत असून पूर्णपणे या क्षेत्रात लक्ष केंद्रित करत आहे.
अक्षय कुमार म्हणाले की, “मला वाटत होतं की तो माझ्यासारखाच अभिनय क्षेत्रात येईल, पण त्याने मला थेट सांगितलं, ‘डॅड, मला चित्रपटांत नाही यायचं.’ मला त्याचा निर्णय अभिमानास्पद वाटतो कारण त्याने आपल्या आवडीचा मार्ग निवडला.”
फक्त 15 व्या वर्षी आरवने लंडनला जाऊन स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याची तयारी केली. तेव्हापासून तो माध्यमांपासून आणि प्रसिद्धीपासून दूर राहून स्वतःचं स्वतंत्र करिअर घडवत आहे. फॅशन इंडस्ट्री आज वेगाने वाढत आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम करिअरच्या संधी निर्माण होत आहेत. जर एखाद्याला क्रिएटिव्ह विचारशक्ती असेल, फॅशनमध्ये रस असेल आणि बारकावे ओळखण्याची दृष्टी असेल, तर या क्षेत्रात मोठं यश मिळू शकतं.
फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर घडवण्यासाठी १२ वी नंतर B.Des, B.Sc, B.A, B.F.Tech (फॅशन डिझाइन/फॅशन टेक्नॉलॉजी) असे ३ ते ४ वर्षांचे पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यानंतर M.Des, M.Fashion Design/Technology असे १ ते २ वर्षांचे पदव्युत्तर कोर्स करता येतात. तसेच या क्षेत्रात Ph.D. पर्यंत शिक्षण घेता येते. या अभ्यासक्रमांसाठी NIFT, NID, UCEED, CEED, CUET यांसारख्या प्रवेश परीक्षांद्वारे प्रवेश मिळतो. काही संस्था मेरिटच्या आधारेही प्रवेश देतात.
फॅशन डिझाइन पूर्ण केल्यानंतर फॅशन डिझायनर, फॅशन मार्केटर, स्टायलिस्ट, क्वालिटी कंट्रोलर, टेक्निकल डिझायनर, फॅशन शो ऑर्गनायझर अशा अनेक पदांवर काम करता येते. पगाराबद्दल बोलायचं झालं, तर नवख्या डिझाइनरचा वार्षिक पगार साधारण ₹३ लाखांपासून सुरू होतो, आणि अनुभव वाढल्यावर तो ₹३०-३५ लाखांपर्यंत जाऊ शकतो. विदेशात काम करणाऱ्या डिझाइनर्सना वर्षाकाठी ₹५० ते ₹७० लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. आरवने घेतलेला हा निर्णय अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. कारण त्याने सिद्ध केलं आहे की, वडिलांच्या प्रसिद्धीच्या छायेत न राहता स्वतःचं स्वतंत्र स्वप्न पूर्ण करणंही तितकंच गौरवाचं असतं.