फोटो सौजन्य - Social Media
मुंबई मेट्रो रेल कॉरपोरेशन लिमिटेड (MMRCL) कडून तरुण आणि अनुभवी उमेदवारांसाठी मोठी रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई मेट्रोच्या एक्वा लाईन-3 च्या विस्तार व संचालनाच्या पार्श्वभूमीवर विविध महत्त्वाच्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती डेप्युटेशन आणि करार पद्धतीने केली जाणार आहे. मेट्रो क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे. या भरती अंतर्गत जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, ज्युनिअर इंजिनिअर आणि डेप्युटी टाउन प्लॅनर अशा जबाबदारीच्या पदांवर नियुक्त्या होणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार दरमहा ₹35 हजारांपासून ते ₹2.80 लाखांपर्यंत आकर्षक वेतन दिले जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
जनरल मॅनेजर आणि असिस्टंट जनरल मॅनेजर पदांसाठी उमेदवाराकडे सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील पदवी असणे आवश्यक आहे. तसेच मेट्रो रेल किंवा मोठ्या पायाभूत सुविधा (Infrastructure) प्रकल्पांमध्ये किमान 12 ते 15 वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे. ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी संबंधित शाखेतील डिप्लोमा किंवा पदवी आणि 2 ते 3 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे. डेप्युटी टाउन प्लॅनर पदासाठी शहरी नियोजन (Urban Planning) विषयातील पदवी आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे गरजेचे आहे.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड वैयक्तिक मुलाखतीच्या (Personal Interview) माध्यमातून केली जाणार आहे. मुलाखतीपूर्वी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव आणि आवश्यक कागदपत्रांच्या आधारे शॉर्टलिस्टिंग केली जाईल. डेप्युटेशन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या मूळ विभागाकडून अनापत्ती प्रमाणपत्र (NOC) सादर करणे आवश्यक असेल.
अर्ज प्रक्रिया कशी असेल?
मुंबई मेट्रोतील या पदांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी MMRCL च्या अधिकृत भरती पोर्टलवर जाऊन अर्ज करावा. अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड कराव्या लागतील.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची संभाव्य अंतिम तारीख 25 मार्च 2026 निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, कोणत्याही अपडेटसाठी MMRCL च्या अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशन नियमितपणे तपासावे. मुंबई मेट्रोचा विस्तार वेगाने सुरू असून, या पार्श्वभूमीवर इंजिनिअरिंग आणि प्लॅनिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही भरती मोठी संधी ठरणार आहे. पात्र उमेदवारांनी ही संधी दवडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.






