फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Bhageerathi Amma Success Story: काही लोकांच्या आयुष्यात संघर्ष हा मरेपर्यंत सुरूच असतो. मात्र या संघर्षावर तुम्ही कशा प्रकारे प्रतिक्रिया देता यावर आपल्या जीवनाची दिशा आणि यश ठरलेले असते. असाच संघर्ष केरळमधील भागीरथी अम्मांच्या जीवनात होता. पण त्यांनी त्याला चोख उत्तर दिले.
केरळमधील कोल्लम येथील रहिवासी असलेल्या भागीरथी अम्मा यांची कथा प्रत्येकासाठी एक प्रेरणा आहे, ज्यांनी वयाच्या १०५ व्या वर्षी पुन्हा एकदा शिक्षणाची वाट धरली आणि संपूर्ण देशासमोर एक नवा आदर्श निर्माण केला.
लहान वयातच आईचे निधन झाल्यामुळे आणि कुटुंबाची व लहान भावंडांची जबाबदारी आल्यामुळे भागीरथी अम्मा यांना आपले शालेय शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले. त्यानंतर वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी पतीचे निधन झाल्यामुळे सहा मुलांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. या सर्व कौटुंबिक संघर्षामुळे शिक्षणाचे त्यांचे स्वप्न मागे पडले होते.
अनेक दशके लोटल्यानंतरही त्यांच्या मनातील शिकण्याची इच्छा तशीच जिंवत होती. केरळ राज्य साक्षरता मिशनच्या माध्यमातून त्यांना वयाच्या १०५ व्या वर्षी पुन्हा शिक्षणाचे दालन खुले झाले. त्यांनी २०१९ मध्ये वयाच्या १०५ व्या वर्षी चौथीची समकक्ष परीक्षा दिली. विशेष म्हणजे, या परीक्षेत त्यांनी एकूण ७५ टक्के गुण मिळवले, तर गणिताच्या विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त करून अनोखा विक्रम केला.
त्यांच्या या जिद्दीची आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल देशपातळीवर घेतली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांच्या ‘मन की बात’ या रेडियो कार्यक्रमात भागीरथी अम्मा यांच्या संघर्षाचा आणि यशाचा विशेष उल्लेख केला होता. तसेच महिलांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना प्रतिष्ठित ‘नारी शक्ति पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले होते.
वयाची कोणतीही सीमा शिक्षणासाठी अडथळा बनत नाही, हे सिद्ध करणाऱ्या भागीरथी अम्मा जुलै २०२१ मध्ये वयाच्या १०७ व्या वर्षी कालगतिविहीन झाल्या, परंतु त्यांची ही संघर्षमय आणि प्रेरणादायी कहाणी आजही लाखो लोकांसाठी नवी उमेद निर्माण करणारी ठरली आहे.






