फोटो सौजन्य - Social Media
महागडी पुस्तके जर आपणाला शंभर- दीडशे रुपयात मिळाली तर आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. नव्याने स्थापन झालेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असणाऱ्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) या संस्थेने महापुरुषांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याचा उपक्रम हाती घेतला असून, ८५ टक्के सवलतीत ही पुस्तके आर्टीच्या कार्यालयात उपलब्ध असल्याची माहिती आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी दिली.
देशातील अनेक महापुरुषांनी पुस्तकांच्या माध्यमातून आपले विचार समाजापर्यंत पोचविण्याच काम केले. त्यांचे विचार नवीन पिढीपर्यंत घेऊन जाण्यासाठी बार्टीचे महासंचालक श्री. वारे आणि निबंधक इंदिरा आस्वार यांच्या संकल्पनेतून आर्टी संस्थेने महापुरुषांच्या पुस्तकांवर ८५ टक्के सवलत देण्याचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. भारताचे संविधान, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले, अण्णा भाऊ साठे यांचे खंड आणि त्यांच्यावर लिहिलेली मराठी, इंग्रजी भाषेतील पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. सामाजिक, राजकीय, खासगी, शासकीय आणि शैक्षणिक संस्था तसेच प्रत्येकांनी संग्रहित ठेवावे, असे हे ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध आहेत.
पुस्तकांची किंमत व त्यावर उपलब्ध असलेल्या सवलतींचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. भारताचे संविधान ४५० रुपये (सवलतीत ६३ रुपये), शूद्र पूर्वी कोण होते? ३०० रुपये (सवलतीत ४५ रुपये), बुद्ध आणि त्यांचा धम्म ४०० रुपये (सवलतीत ६० रुपये), डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र चांगदेव खैरमोडे सेट ४,००० रुपये (सवलतीत ६०० रुपये), समग्र आंबेडकर चरित्र बो. सी. कांबळे सेट २,५०० रुपये (सवलतीत ३७५ रुपये), फकिरा १६० रुपये (सवलतीत २४ रुपये), फकिराचा इंग्रजी अनुवाद २,५०० रुपये (सवलतीत ३७५ रुपये), अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान ४८० रुपये (सवलतीत ७२ रुपये), राजर्षी शाहू: रयतेच्या राज्याचे चित्रमय चरित्र १,५०० रुपये (सवलतीत २२५ रुपये), साहित्यसम्राट १५० रुपये (सवलतीत २३ रुपये), स्वराज्य ते स्वातंत्र्य आणि समता १२० रुपये (सवलतीत १८ रुपये), तर कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व १,१०० रुपये (सवलतीत १६५ रुपये) दराने उपलब्ध आहे. यांची एकूण किंमत ११,५२६ रुपये असून सवलतीच्या दरात केवळ १,७३० रुपयांत ही पुस्तके उपलब्ध होत आहेत, असे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे.
पुस्तके विक्रीची उत्साहवर्धक आकडेवारीही देण्यात आली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत संस्थेने ८० हजार रुपयांच्या पुस्तकांची विक्री केली असल्याचे श्री. वारे यांनी सांगितले. या पुस्तकांची विक्री आर्टी कार्यालयात केली जात असून, कार्यालयाचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे: बी-२०१/२०२, दुसरा मजला, ‘बी’ विंग, अर्जून सेंटर, स्टेशन रोड, गोवंडी (ईस्ट). गोवंडी स्थानकापासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणी वाचकांना विविध साहित्य खरेदी करता येणार आहे. आर्टी संस्था वाचकांसाठी दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर आधारित उच्च दर्जाची पुस्तके उपलब्ध करून देत असल्याने वाचकांची पसंती मिळवत आहे. ही संस्था साहित्यप्रेमींसाठी एक महत्त्वाचे केंद्र ठरली असून, विविध लेखकांच्या पुस्तकांना मिळणारा वाचकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.