डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
कराड/प्रतिनिधी : डॉ. अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिट्यूट्स अंतर्गत डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने, तसेच सी.जी.सी. डेन्मार्क यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इमर्जिंग टेक्नॉलॉजीज, इनोव्हेशन अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद २३ व २४ मार्च २०२६ रोजी महाविद्यालयाच्या परिसरात होणार आहे.
या परिषदेचे उद्घाटन शारदा विद्यापीठ, नोएडा (उत्तर प्रदेश) येथील कुलगुरू डॉ. सिबाराम खारा यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला आय.एस.टी.ई., नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी.जी.सी. डेन्मार्कचे अध्यक्ष प्रो. रामजी प्रसाद, तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक गुजर उपस्थित राहणार आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्वर मुल्ला व उपप्राचार्य प्रा. हणमंत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, नवकल्पना आणि शाश्वत विकास या विषयांवर विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन, संशोधन निबंध सादरीकरण, तांत्रिक सत्रे तसेच चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्वर मुल्ला आणि सचिव डॉ. माधुरी गुजर यांनी दिली.
या परिषदेत देश-विदेशातील नामवंत तज्ज्ञ, प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, विविध विषयांवरील संशोधनपर लेख सादर करण्यात येणार आहेत. या माध्यमातून संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना संशोधनातील नवीन प्रवाह समजून घेण्याची संधी मिळणार असून, शैक्षणिक क्षेत्रातील विचारांची देवाणघेवाण होण्यास मोठी मदत होणार आहे. संस्थेने यापूर्वी सन २००२ व २०१३ मध्येही आंतरराष्ट्रीय परिषदांचे यशस्वी आयोजन केले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक गुजर यांनी दिली.
या परिषदेचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपाध्यक्ष इंद्रजीत गुजर यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. दरम्यान, या परिषदेस संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परिषदेचे आयोजक डॉ. रामचंद्र गुरव व प्रा.सौ. शीतल काकडे यांनी केले आहे.






