Cannabis Cultivation : आम्हाला तोपर्यंत गांज्याची शेती करू द्या, नाशिकच्या शेतकऱ्याची थेट राष्ट्रपतींकडे मागणी, सौजन्य : सोशल मीडिया
गांजाची लागवड करणं महाराष्ट्रात एक गुन्हा आहे. पण नाशिकच्या एका शेतकऱ्यानं थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपल्याला गांजा व खसखसीची शेती (Cannabis Cultivation) करू द्यावी अशी मागणी केली आहे. नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या संदर्भ देत या शेतकऱ्यानं केलेल्या मागणीनंतर एकच खळबळ उडाली आहे.
नाशिकमधील सायाळे गावचे शेतकरी विजय रामनाथ शिंदे यांनी या संदर्भात राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे. गांजाची वनस्पती ही तशी औषधीच, पण त्याचे काही चांगले व काही वाईट गुण आहेत. म्हणून राज्यात त्याच्या लागवडीला परवानगी नाही. दरम्यान, शिंदे यांच्या या अनोख्या मागणीची सध्या नाशिकसह राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान शिंदे यांनी अनेक बाबींना हात घातला. यावर्षी नाशकात कुंभमेळा होणार असून येथे लाखोंच्या संख्येने सांधू येणार आहेत. या साधूंना लागणारा गांजा बाहेरील राज्यातून येतो. सध्या राज्यातील दुष्काळाची स्थिती पाहता, गांजा व खसखसची तात्पुरत्या स्वरुपात का होईना आम्हाला लागवड करू द्या अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसंच काही राज्यांमध्ये गांजा शेतीला अटीशर्थींसह परवानगी देण्यात येते. मग महाराष्ट्रात का नाही? तसंच मी जर काही चुकीचं म्हणत असेन तर माझ्यावर गुन्हा दाखल करा असंही शेतकरी शिंदे यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले.
विजय शिंदे यांनी निवेदनातून शेतीसमोरील आर्थिक अडचणी मांडल्या आहेत. यंदा झालेला पाऊस, शेतीमालाला मिळणारा कवडीमोल भाव आणि दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पारंपरिक शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने पर्यायी पिकांचा विचार करणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी गांजा आणि खसखस लागवडीसाठी स्थानिक शेतकऱ्यांना परवानगी देण्याची मागणी केली आहे.
गांजा लागवडीसाठी परवानगी मागण्याची सिन्नर तालुक्यातील ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी याच वर्षी मे महिन्यात शेतकरी सुनील उकिर्डे यांनीही प्रशासनाकडे अशी मागणी केली होती. कांद्याला अवघा 12.35 रुपये प्रतिकिलो भाव मिळाल्याने त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. या नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी तहसीलदारांना निवेदन देत गांजा लागवडीची परवानगी मागितली होती.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नाशिक दौऱ्यावर आल्या असताना विजय शिंदे यांनी त्यांच्याकडे हे निवेदन सादर केल्याचे सांगण्यात येत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचा संदर्भ देत त्यांनी आपल्या मागणीचे समर्थन केल्याचीही चर्चा आहे. आता या मागणीची शासनाकडून काय दखल घेतली जाते, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.
Ans: सिन्नर तालुक्यातील सायाळे गावचे शेतकरी विजय रामनाथ शिंदे यांनी ही मागणी केली आहे.
Ans: शेतीमालाला मिळणारा कमी बाजारभाव, पर्जन्यमान आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेती आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे.
Ans: भारतामध्ये गांजाच्या लागवडीवर कायदेशीर निर्बंध आहेत. मात्र, वैद्यकीय आणि वैज्ञानिक कारणांसाठी नियंत्रित परवानगी दिली जाऊ शकते. अफूच्या लागवडीसाठीही केंद्र सरकारच्या नियमानुसार परवाना आवश्यक असतो.






