
५ लाख ७४ हजार ९४५ विद्यार्थ्यांना मिळाले पसंतीचे महाविद्यालय
३ जूनपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत
शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली माहिती
सोनाजी गाढवे /पुणे: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी शुक्रवारी दिंनाक २९ सकाळी जाहीर करण्यात आली असून, राज्यातील ५ लाख ७४ हजार ९४५ विद्यार्थ्यांना (Career) त्यांच्या पसंतीनुसार कनिष्ठ महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांनी बुधवार दि. ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक असल्याची माहिती शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.
राज्यात शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदा राज्यभरात अकरावीसाठी एकूण २१ लाख ९८ हजार ६६६ जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पहिल्या नियमित फेरीत ८ लाख ८७ हजार २६४ विद्यार्थ्यांनी ‘कॅप लॉक’ प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यापैकी गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्या पसंतीक्रमानुसार ५ लाख ७४ हजार ९४५ विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले आहे.
दरम्यान, यंदाच्या दहावी परीक्षेत राज्यात १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी १२ लाख ५१ हजार २९४ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. काही विद्यार्थ्यांनी आयटीआय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचा पर्याय निवडल्याचेही स्पष्ट झाले आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रिया केवळ ऑनलाइन पद्धतीनेच राबविण्यात येत असून, ऑफलाइन प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही, असे शिक्षण विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावरील प्रक्रियेनुसारच प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेश निश्चितीसाठी आवश्यक प्रक्रिया
पहिल्या नियमित फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही माहिती पाठविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून विहित शुल्क भरावे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी आणि प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर महाविद्यालयाच्या लॉगिनवर प्रवेशाची पुष्टी केली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले महाविद्यालय मान्य नसेल, त्यांना प्रवेश नाकारण्याची तसेच प्रवेश रद्द करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया बुधवार दि. ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी विभागनिहाय जागा आणि पहिल्या फेरीत वाटप
विभाग – प्रवेश क्षमता – कॅप लाॅक – महाविद्यालय वाटप
अमरावती – २०१२१५ – ८७९९२ – ५८६८६
छत्रपती संभाजीनगर – ३१९०४५ – ९७९४४ – ६४८६८
कोल्हापूर – २०२९८० – ९४७७३ – ५४७७०
लातूर – १५४०९० – ५१३०० – ३३६७४
मुंबई – ४७७२१० – २१२९१७ – १३३३२३
नागपूर – २२४९९५ – ७७४५३ – ५४९३७
नाशिक – २२२८६५ – १०२९०७ – ६५०६४
पुणे – ३९६२६६ – १७२७९१ – १०९६२३
एकूण – २१९८६६६ – ८८७२६४ – ५७४९४५
विभागनिहाय पहिल्याच दिवशी झालेले प्रवेश
विभाग – कॅप – इनहाऊस – अल्पसंख्याक – व्यवस्थापन
अमरावती – १७६ – ४६ – १८ – ७
छत्रपती संभाजीनगर – १८७ – ३० – ७ – १३
कोल्हापूर – २४८ – ७४ – २५ – ११
लातूर – ९१ – ११ – ०० – ०५
मुंबई – २०२ – ५७ – २९ – १०
नागपूर – २६५ – ५२ – १० – १६
नाशिक – २८९ – १९ – १६ – ११
पुणे – ५५९ – ३९ – ३३ – २५
एकूण – २०१७ – ३२८ – १३८ – ९८