फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Career Tips for Students :आजच्या काळात केवळ चांगली पदवीच नाही तर उत्तम कौशल्ये असणारी विद्यार्थी चांगली नोकरी मिळवतात. आता नोकरी देणाऱ्या कंपन्या अशा उमेद्वारांच्या शोधात असतात, ज्यांच्याकडे शिक्षणासोबतच व्यवहारिक आणि व्यवसायिक कौशल्ये देखील असतात.
बदलत्या काळाबरोबरच कामाच्या ठिकाणच्या गरजाही बदलत आहेत. ज्या व्यक्ती टीमसोबत काम करू शकतात. समस्यांवर अचूक तोडगा काढू शकतात आणि नवीन परीस्थितीशी पटकन जुळवून घेऊ शकतात, अशा लोकांना कंपन्या अधिक महत्त्व देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉलेज सुरू असताना काही कौशल्ये आत्मसात केली तर त्यांना शिक्षणासोबतच भविष्यातील करिअरमध्येही मोठा फायदा मिळू शकतो.
सर्वात महत्त्वाच्या कौशल्यामध्ये कम्युनिकेशन स्किल (संभाषण कौशल्य) आणि टीमवर्क यांचा समावेश होतो. कम्युनिकेशन म्हणजे केवळ संवाद साधणे नव्हे तर आपले म्हणणे योग्य पद्धतीने मांडणे, इतरांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे आणि आत्मविश्वासाने संवाद साधणे हा होतो. कॉलजमध्ये प्रेझेंटेशन, ग्रुप डिस्कशन, गटचर्चा आणि मुलाखतीमध्ये हे कौशल्य खूप उपयोगी पडते.
आजच्या कॉर्पोरेट जगतातही टीमवर्क स्किल्सदेखील अत्यंत महत्त्वाच्या बनल्या आहेत. कोणत्याही कंपनीत टीमसोबत मिळून काम करणे गरजेचे असते. जे विद्यार्थी इतरांशी समायोजन साधून चांगल्या प्रकारे काम करू शकतात आणि ज्यांना टीमच्या ध्येयाला प्राधान्य देणे आवडते. त्यांना नोकरीत चांगल्या संधी मिळू शकते.
याशिवाय टाईम मॅनेजमेंट (वेळेचे नियोजन), प्रॉब्लेम सॉल्व्हिंग (समस्या निवारण) आणि अॅडॉप्टॅबिलिटी (परिस्थितीशी जुळवून घेणे) ही कौशल्येही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची मानली जातात. टाईम मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना अभ्यास, वैयक्तिक आयुष्य, दैनंदिन काम आणि इतर उपक्रमांमध्ये समतोल राखण्यास मदत करते, तर दुसरीकडे समस्या निवारण आणि क्रिटिकल थिंकिंग (सखोल विचार प्रक्रिया) ही कौशल्ये कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यास मदत करतात.
आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात अॅडॉप्टॅबिलिटी देखील खूप महत्त्वाची आहे, कारण ज्या व्यक्ती लवकर शिकतात, त्या बदलाशी लवकर जुळवून घेतात. अशा कर्मचाऱ्यांना कंपन्या जास्त पसंती देतात. सुरुवातीच्या काळापासून या कौशल्यावर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन उत्तम पगार आणि करिअरमध्ये वेगाने प्रगती करण्याच्या संधी मिळतात.






