फोटो सौजन्य- सोशल मीडिया
IIM Admissions 2026 : देशातील प्रतिष्ठित ‘इंडियन इंस्टीट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट’ (IIM) आता त्यांच्या अंडरग्रेजुएट प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहेत. माहितीचा अधिकार अंतर्गत १५ सप्टेंबर २०२६ रोजी समोर आलेल्या दस्तऐवजांनुसार, सर्व IIM मिळून UG प्रोग्राम्ससाठी एकच ‘कॉमन एंट्रन्स टेस्ट’ आणि एमबीए प्रवेशासाठी ‘सेंट्रलाइज्ड डिजिटल कौन्सिलिंग प्लॅटफॉर्म’ सुरू करण्यावर चर्चा करत आहेत. हा प्रस्ताव १४ मे २०२६ रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या IIM कोऑर्डिनेशन फोरमच्या बैठकीत मांडण्यात आला होता.
सध्या देशातील २२ IIM पैकी १३ IIM मध्ये UG प्रोग्राम्स चालवले जातात. यामध्ये इंदूर, रोहतक, रांची, जम्मू, बोधगया, अमृतसर आणि शिलॉन्ग यांसारख्या संस्थांचा समावेश आहे. सध्या या सर्व संस्थांमध्ये प्रवेशासाठी १० हून अधिक वेगवेगळ्या परीक्षा आणि पद्धती वापरल्या जातात.
यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक IIM साठी वेगवेगळी परीक्षा द्यावी लागते, ज्याने मोठा गोंधळ निर्माण होतो. एकाच प्रकारच्या कोर्ससाठी वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा घेणे अयोग्य असून ते टाळले पाहिजे, असे मत तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले होते.
कॉमन डिजिटल कौन्सिलिंग प्लॅटफॉर्म: IIM मुंबईने जुलै २०२६ च्या अखेरपर्यंत शिक्षण मंत्रालयाला एका कॉमन डिजिटल कौन्सिलिंग प्लॅटफॉर्मचे प्रारूप सादर केले आहे. यामागचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या IIM मध्ये वारंवार जागा बुक करणे आणि नॉन-रिफंडेबल फी भरण्याच्या आर्थिक नुकसानापासून वाचवणे हा आहे.
समान फी-रिफंड पॉलिसी: २०२६-२७ च्या शैक्षणिक सत्रापासून UGC च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व IIM मध्ये एकच ‘फीस-रिफंड पॉलिसी’ लागू केली जाईल. सध्या वेगवेगळ्या IIM मधील वेगवेगळे नियम यामुळे एका संस्था सोडून दुसऱ्या संस्थेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते.






