फोटो सौजन्य - Social Media
रेल्वे विभागात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी एकूण 368 पदे उपलब्ध असून इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची संधी 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत असेल. त्यामुळे इच्छुकांनी अंतिम तारखेपूर्वी सर्व कागदपत्रांसह अर्ज पूर्ण करावा.
या पदासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. मात्र अधिक सविस्तर पात्रता निकष विस्तृत अधिसूचनेत दिले जातील. वयोमर्यादा सर्वसाधारण उमेदवारांसाठी 20 ते 33 वर्षे आहे. तसेच SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची सवलत तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची सवलत मिळेल.
या पदासाठी पे लेव्हल-6 अंतर्गत पगार निश्चित करण्यात आला आहे. सुरुवातीला निवड झालेल्या उमेदवारांना ₹35,400 मासिक वेतन मिळेल. याशिवाय रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या इतर सुविधा व भत्त्यांचाही लाभ मिळणार आहे.
उमेदवारांनी L-2 स्टँडर्ड वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे शारीरिक व आरोग्य निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनाच या भरतीत संधी मिळेल.
ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांचा आधार क्रमांक अनिवार्य असेल. त्यामधील नाव व जन्मतारीख दहावीच्या प्रमाणपत्राशी जुळली पाहिजे. तसेच अर्ज करण्यापूर्वी आधारमध्ये ताजे फोटो व बायोमेट्रिक्स (फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन) अपडेट करणे आवश्यक आहे.
याचबरोबर रेल्वे भरती बोर्डाने NTPC CBT-1 परीक्षा (ग्रॅज्युएट लेव्हल) संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. ही परीक्षा 5 ते 24 जून 2025 दरम्यान पार पडली होती. त्याची प्रोविजनल उत्तरतालिका 1 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झाली असून, उमेदवारांना 6 जुलै 2025 पर्यंत आक्षेप नोंदवण्याची मुदत देण्यात आली आहे. अंतिम निकाल लवकरच जाहीर होणार असून तो उमेदवारांना rrbcdg.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. रेल्वे क्षेत्रातील ही भरती तरुणांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करून ही संधी गमावू नये.