Mumbai AC Vande Metro (Photo Credit - X)
Mumbai AC Vande Metro: मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनचे स्वरूप आता पूर्णपणे बदलणार आहे. येणाऱ्या काळात मुंबई आणि उपनगरांमध्ये जुन्या लोकलऐवजी अत्याधुनिक एसी वंदे मेट्रो (उपनगरीय) ट्रेन धावताना दिसतील. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (एमआरव्हीसी) ने २,८५६ पूर्णपणे वातानुकूलित वंदे मेट्रो कोचची खरेदी आणि त्यांच्या दीर्घकालीन देखभालीसाठी निविदा काढली आहे.
सध्या मुंबईत मुख्यतः १२ आणि काही ठिकाणी १५ डब्यांच्या लोकल धावतात. मात्र, वंदे मेट्रोचे नवीन रॅक १२, १५ आणि १८ डब्यांचे असतील. यामुळे मुंबईतील प्रचंड गर्दी अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करता येईल. तसेच, प्रवाशांची क्षमता, आराम आणि सुरक्षितता मोठ्या प्रमाणात वाढेल. पुढील ७ ते ८ वर्षांत मुंबई उपनगरीय सेवेत किमान २३८ वंदे मेट्रो गाड्या उपलब्ध होतील.
वंदे मेट्रो कोचच्या देखभालीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर दोन नवीन डेपो बांधले जाणार आहेत. हे डेपो मध्य रेल्वेवर भिवपुरी आणि पश्चिम रेल्वेवर वाणगाव येथे उभारले जातील. या गाड्यांची पुढील ३५ वर्षांसाठी देखभाल करण्याची जबाबदारी निविदा जिंकणाऱ्या कंपनीची असेल. एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास सोपान वाडेकर यांच्या मते, ही खरेदी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत एक ऐतिहासिक बदल घडवून आणेल. हे रेक ‘मेक इन इंडिया’ धोरणानुसार तयार केले जातील, ज्यामुळे देशांतर्गत उत्पादन आणि तंत्रज्ञानाला चालना मिळेल.
मुंबई लोकलचा चेहरामोहरा बदलून प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास देण्यासाठी सुमारे २१ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च केंद्र आणि राज्य सरकार अर्धा-अर्धा वाटून घेतील. तज्ज्ञांनुसार, भारतीय रेल्वे किंवा आशियामध्ये रोलिंग स्टॉक खरेदीसाठी काढलेली ही सर्वात मोठी निविदा आहे. निविदेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि प्रोटोटाइप ट्रेनच्या चाचण्या झाल्यावर, पुढील ५ वर्षांत मुंबईला वंदे मेट्रोची भेट मिळेल. दररोज ८० लाखांपेक्षा जास्त प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करतात, त्यामुळे हा बदल त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.