छत्रपती संभाजीनगरहून जाणाऱ्या तब्बल 9 ट्रेन रद्द; प्रवाशांना बसला मोठा फटका '(फोटो सौजन्य - iStock)
छत्रपती संभाजीनगर : लांबच्या पल्ल्याच्या प्रवासासाठी किफायतशीर प्रवास म्हणून भारतीय रेल्वेला प्राधान्य दिलं जातं. देशासह महाराष्ट्रातही रेल्वेचे मोठं जाळं आहे. मराठवाड्यामध्येही रेल्वेचे मोठे जाळे विस्तारले असून, रोज लाखो प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात. सध्या मनमाड रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण सुरू आहे. त्यामुळे संभाजीनगरवरून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांना याचा फटका बसलेला आहे. काही रेल्वेंच्या मार्गात बदल करण्यात आला असून, 9 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मराठवाड्यातील विविध ठिकाणांहून मुंबई-पुण्यासह दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. त्यातच मनमाड रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण सुरू असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरवरून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांना याचा फटका बसलेला आहे. काही रेल्वेंच्या मार्गात बदल करण्यात आला असून ९ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत रेल्वेकडून माहिती देण्यात आली आहे.
मनमाड स्थानकातील नूतनीकरणामुळे ५ ते ७ सप्टेंबर दरम्यान छत्रपती संभाजीनगरहून जाणाऱ्या रेल्वे सेवेचा मोठा फटका बसणार आहे. नांदेड, हिंगोली, सिकंदराबादहून येणाऱ्या व जाणाऱ्या पाच गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. तीन गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या असून, दोन गाड्या उशिराने सोडण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे २० हजार प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत
हैदराबाद विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नांदेड विभागातील नऊ गाड्यांसाठी रेक उपलब्ध नाहीत. त्यामुळे २ ते ४ सप्टेंबरदरम्यान या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नांदेड विभागातून मनमाडमार्गे जाणाऱ्या गाड्या मनमाड स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामामुळे इतर मार्गांनी वळवण्यात आल्या आहेत. पुणे, मुंबई आणि नवी दिल्लीकडे जाणाऱ्या दहा गाड्यांचा यात समावेश आहे.