फोटो सौजन्य - Social Media
रेल्वे भर्ती बोर्डाने (RRB) पॅरामेडिकल स्टाफच्या ४३४ पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. याआधी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबर जाहीर करण्यात आली होती, मात्र आता ती वाढवून १८ सप्टेंबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेत स्थिर आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तसेच पॅरामेडिकल क्षेत्रात आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
या भरतीमध्ये सर्वाधिक भरती नर्सिंग सुपरिटेंडंट या पदासाठी होणार आहे. एकूण २७२ पदांसाठी भरती जाहीर झाली असून यासाठी सुरुवातीचे वेतन ₹४४,९०० इतके असेल. त्याचबरोबर फार्मासिस्ट (१०५ पदे) यासाठी ₹२९,२०० वेतन, हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर (३३ पदे) यासाठी ₹३५,४०० वेतन जाहीर करण्यात आले आहे. तर डायलिसिस टेक्निशियन, रेडिओग्राफर (एक्स-रे टेक्निशियन) आणि ईसीजी टेक्निशियन या पदांसाठी प्रत्येकी ४ पदे उपलब्ध आहेत आणि त्यांना सुरुवातीचे वेतन ₹२५,५०० ते ₹३५,४०० या दरम्यान असेल.
वयोमर्यादा पदानुसार वेगळी ठेवण्यात आली आहे. काही पदांसाठी किमान वयाची अट १८ वर्षे आहे, तर काहींसाठी ती १९ किंवा २० वर्षे ठरवली आहे. कमाल वयोमर्यादा मात्र पदानुसार बदलते, जी ३३, ३५ किंवा ४० वर्षांपर्यंत असू शकते. त्यामुळे उमेदवारांनी आपले वय आणि पात्रता नीट पाहून अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक पात्रताही पदानुसार बदलते. अधिकृत अधिसूचनेत (Notification) प्रत्येक पदासाठी लागणारी पात्रता सविस्तरपणे दिली आहे. उमेदवारांनी कोणतीही चूक होऊ नये म्हणून अधिसूचना काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
या भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड तीन टप्प्यांतून होणार आहे. पहिल्या टप्प्यात कंप्युटर आधारित परीक्षा (CBT) होईल. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगची पद्धत असेल. प्रत्येक बरोबर उत्तराला १ गुण दिला जाईल, तर चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील. त्यामुळे परीक्षेची तयारी करताना उमेदवारांनी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. दुसऱ्या टप्प्यात पात्र उमेदवारांची दस्तऐवज पडताळणी (Document Verification) होईल. अखेरच्या टप्प्यात वैद्यकीय तपासणी (Medical Test) होऊन अंतिम निवड केली जाईल. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असेल. उमेदवारांनी rrbapply.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर आपल्या विभागानुसार (जसे RRB मुंबई, RRB इलाहाबाद इ.) योग्य पर्याय निवडावा. संबंधित विभागाच्या नोटिफिकेशनमधील “CEN No…” या सेक्शनखाली पॅरामेडिकल भरती २०२५ चे अधिसूचना तपासता येईल. नोंदणीसाठी उमेदवारांनी आपले नाव, मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी टाकून नवीन रजिस्ट्रेशन करावे. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या लॉगिन तपशीलांच्या आधारे अर्ज फॉर्म भरावा.
फॉर्म भरताना उमेदवारांनी आपला पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी तसेच आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे दिलेल्या आकार आणि स्वरूपात अपलोड करावी. त्यानंतर आपल्या पदाच्या श्रेणीनुसार ऑनलाइन शुल्क भरावे. सर्व माहिती नीट तपासून शेवटी Final Submit वर क्लिक करणे आवश्यक आहे. अर्ज सबमिट झाल्यावर त्याचा प्रिंट आउट घेऊन तो सुरक्षित ठेवावा, कारण पुढील टप्प्यांत त्याची आवश्यकता भासू शकते. रेल्वेतील ही भरती केवळ स्थिर नोकरीची संधी नाही, तर पॅरामेडिकल क्षेत्रात आपली कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी उत्तम व्यासपीठ आहे. समाजाला प्रत्यक्ष आरोग्यसेवा पुरवण्याची संधी मिळत असल्याने ही नोकरी प्रतिष्ठेची आणि जबाबदारीची देखील आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळ न दवडता लवकर अर्ज करावा.