फोटो सौजन्य सोशल मीडिया
नीता परब : खारघर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे ११११ फूट तिरंगा यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली ही तिरंगा यात्रा रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून सुरू होऊन उत्सव चौक येथे पोहोचली. राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशभक्तीची भावना आणि राष्ट्रनिर्माणाचा संदेश देत या यात्रेत पनवेल व खारघर परिसरातील १७०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.
तिरंगा यात्रेदरम्यान संपूर्ण परिसरात राष्ट्रभक्तीचा उत्साह आणि जोशपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत भारताच्या एकात्मता, अखंडता आणि गौरवाचे दर्शन घडविले.
यात्रेचा समारोप उत्सव चौक, खारघर येथे करण्यात आला. यावेळी अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री पायल किनाके यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्या म्हणाल्या, “ही स्वप्न पाहणारी आणि ती पूर्ण करण्याची तयारी ठेवणारी युवा पिढी आहे. त्यामुळे आता ‘भारत माझ्यासाठी काय करणार?’ यापेक्षा ‘मी भारतासाठी काय करणार?’ हे अधिक महत्त्वाचे आहे.” असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, अभाविप जिल्हा संयोजक ऋतुजा भोर आणि पनवेल महानगर मंत्री नील कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रशांत ठाकूर म्हणाले, “अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थ्यांना देशभक्तीची प्रेरणा देणारी आणि जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे.” युवा पिढीमध्ये राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्याच्या अभाविपच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या समारोपानंतर तिरंगा यात्रेत सहभागी झालेल्या विविध शाळा व महाविद्यालयांचा अतिथींच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी जोशपूर्ण घोषणा देत राष्ट्रभक्तीने भारलेल्या वातावरणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
“वंदे मातरम्” आणि “भारत माता की जय”च्या घोषणांनी खारघर परिसर दुमदुमून गेला.

