सौजन्य - नवराष्ट्र टीम
चाकण : चाकण नगरपरिषदेत विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षासोबत सामील असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. मात्र, कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी सत्ताधाऱ्यांसोबत नसून चाकण शहराचा विकास आणि जनतेच्या हितासाठी आवश्यक त्या ठिकाणी सहकार्य करीत आहोत. मात्र, जनतेच्या पैशांचा अपव्यय अथवा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. या पत्रकार परिषदेला गटनेते साहेबराव कड, विरोधी पक्षनेते प्रकाश भुजबळ, नगरसेवक सागर बनकर, आकाश जाधव, करण सोनावणे, नगरसेविका विजया तोडकर, वर्षा शेवकरी, रेश्मा मुटके यांच्यासह किशोर जगनाडे आणि दत्तात्रय जाधव उपस्थित होते.
अतिक्रमण कारवाईबाबत माहिती न दिल्याचा आरोप
यावेळी साहेबराव कड यांनी नगरपरिषदेने नुकत्याच केलेल्या अतिक्रमण कारवाईबाबत विरोधी पक्षातील नगरसेवकांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचा आरोप केला. नगरपरिषदेतील महत्त्वाच्या विषयांबाबत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना जाणीवपूर्वक माहिती दिली जात नसल्याचेही त्यांनी सांगितले. नगरपरिषद प्रशासनाने अशा महत्त्वाच्या बाबींमध्ये पारदर्शकता ठेवली नसल्याचा आरोप कड यांनी केला.
झाडू खरेदीच्या दरावर आक्षेप
नगरपरिषदेच्या आरोग्य विभागासाठी करण्यात येणाऱ्या विविध साहित्य खरेदीवरही नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. विशेषतः झाडू खरेदीच्या निविदेतील दराबाबत आक्षेप नोंदविण्यात आला. बाजारात साधारणपणे १५० ते २०० रुपयांच्या दरात मिळणाऱ्या झाडूसाठी वाढीव दराने खरेदी केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक सागर बनकर यांनी या साहित्य खरेदीला विरोध केला. जनतेच्या पैशातून होणाऱ्या प्रत्येक खरेदीमध्ये बाजारभावाची योग्य तपासणी करून आर्थिक शिस्त पाळणे आवश्यक असल्याचे बनकर यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?
४० कोटींच्या निधीचा हिशेब मागितला
नगरपरिषदेच्या आर्थिक स्थितीबाबतही विरोधी पक्षनेते प्रकाश भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रशासक राजवट येण्यापूर्वी नगरपरिषदेकडे जवळपास ४० कोटी रुपयांचा निधी असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर या निधीचा नेमका वापर कसा झाला, याबाबत विरोधी पक्षाला स्पष्ट माहिती मिळालेली नाही. या निधीचा वापर, खर्च आणि शिल्लक रकमेचा हिशेब जनतेसमोर मांडावा, अशी मागणी भुजबळ यांनी केली. नगरपरिषदेच्या कारभारात आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि जनतेच्या पैशांचा योग्य वापर झाला नाही, तर भविष्यात नगरपरिषदेच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. कारभारात अशीच परिस्थिती राहिल्यास चाकण नगरपरिषद आर्थिक अडचणीत येऊ शकते, असा इशाराही यावेळी देण्यात आला. नगरपरिषदेच्या विविध खरेदी प्रक्रिया, अतिक्रमण कारवाई तसेच आर्थिक व्यवहारांबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी आणि संबंधित माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली.






