दांडिया-गरबा उत्सवावरून शिंदे गटाची रवींद्र चव्हाणांवर टीका
Dombivali News : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा दांडिया-गरबा उत्सव रद्द करून त्यासाठीचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती काही दिवसापूर्वी समोर आली होती. मात्र, दुसरीकडे डोंबिवलीचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसून सावळाराम क्रीडा संकुलात कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
“गुजराती आणि जैन समाजाला दुखावण्याची हिंमत रवी चव्हाण करणार नाही,” असा दावा कदम यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. तसेच, “गुजराती मतदारांपुढे दुष्काळग्रस्त शेतकरी आणि एकंदरीतच मराठी माणूस यांची किंमत किती आहे, हे भाजपने दाखवून दिले आहे,” अशी टीकाही त्यांनी केली आहे.
KDMC News: केडीएमसीची STP निविदा वादात; नव्या कंत्राटदारांना संधी नसल्याचा नितीन तरे यांचा आरोप
“मराठी माणसाने या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात,” असे आवाहनही कदम यांनी केले आहे. या पोस्टनंतर डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाते याकडे लक्ष लागले आहे.






