
neet pg
NEET PG 2026 Result: मेडिकल पीजी कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यास उत्सुक असलेल्या देशभरातील लाखो उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) द्वारे NEET PG २०२६ चा निकाल आणि अंतिम उत्तरपत्रिका ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत जारी केली जाण्याची शक्यता आहे. बोर्डाच्या अधिकृत वेळापत्रकानुसार, निकाल जाहीर करण्याची अंतिम मर्यादा ३० सप्टेंबरच निश्चित करण्यात आली आहे. अद्याप बोर्डाने निकाल जाहीर करण्याची अचूक तारीख आणि वेळ जाहीर केलेली नाही, परंतु फायनल आन्सर की आणि निकाल एकाच वेळी वेबसाइटवर लाईव्ह केले जाण्याची शक्यता आहे.
नीट पीजी २०२६ च्या मुख्य परीक्षेचे आयोजन देशात ३० ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले होते. या परीक्षेसाठी एकूण २,६५,९८० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,६३,५३५ उमेदवार परीक्षेत सहभागी झाले होते. ही परीक्षा देशातील ३३८ शहरांमधील ११११ केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती.
दरम्यान, ३० ऑगस्ट रोजी परीक्षा सुरू असताना राजस्थानच्या जयपूरमध्ये एक तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. जयपूरमधील सीतापुरा परिसरातील दोन केंद्रांवर अचानक वीज गेल्यामुळे परीक्षा मध्येच थांबवावी लागली होती. त्यानंतर, बोर्डाने या केंद्रांवरील प्रभावित झालेल्या २,४४५ उमेदवारांसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. ही पुनर्रपरीक्षा (Re-exam) ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता यशस्वीरीत्या पार पडली.
नीट पीजी परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, यावेळी जी आन्सर की जारी केली जाईल, ती प्रॉव्हिजनल नसून थेट फायनल आन्सर की असेल. याचा अर्थ असा की, बोर्डाच्या तज्ज्ञांकडून उमेदवारांच्या सर्व आक्षेपांची आणि सूचनांची छाननी केल्यानंतरच ती तयार केली जात आहे. याच फायनल आन्सर कीच्या आधारे विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यमापन केले जाईल आणि मेरीट लिस्ट तयार केली जाईल. निकालासोबतच बोर्ड श्रेणीनुसार (Category-wise) कट-ऑफ मार्क्स देखील जाहीर करेल. तसेच नीट पीजी पात्रतेसाठी अनिवार्य असलेली इंटरशिप पूर्ण करण्याची कट-ऑफ तारीख ३० सप्टेंबर २०२६ हीच ठरवण्यात आली आहे.
MPSC paper leak घोटाळा; २७० पानांच्या व्हॉट्सॲप चॅटने उघड केले ९१ प्रश्नांचे गूढ!
1. सर्वांत आधी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनच्या अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर जा.
2. येथे तुम्हाला NEET PG २०२६ फायनल आन्सर की किंवा निकालाशी संबंधित थेट लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
3. क्लिक केल्यानंतर आन्सर की पीडीएफ फाईलच्या स्वरूपात तुमच्या स्क्रीनवर उघडेल.
4. उमेदवार ही पीडीएफ डाऊनलोड करू शकतात आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढून ठेवू शकतात.