
वाखारवाडी, धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील वाखरवाडी गावात “दीपक भाऊ” म्हणजेच दीपक शिंदे यांनी गावातील प्रत्येक मुलाने शाळेत जावे, ही आपली जबाबदारी बनवली आहे. स्वतः विद्यार्थी असताना, कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे दीपक यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. पण आता बऱ्याच वर्षांनंतर, ते त्याच शाळेत परतले, विद्यार्थी म्हणून नव्हे, तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून. त्यांच्या नेतृत्वाखाली, ही समिती शाळा आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सक्रियपणे काम पाहते. शाळेच्या दुरुस्तीसाठी निधी उभारणी करणे, मुलांसाठी शौचालय, पिण्याचे पाणी याची योग्य व्यवस्था तसेच लिंग समभावाच्या विचाराला प्रोत्साहन देण्याचे काम आणि उपक्रम या समितीच्या सहकार्याने होतात.
दीपक भाऊंचे महत्त्वाचे योगदान म्हणजे गावातील पारधी समाजातील मुलांना शाळेत आणणे. ब्रिटिश काळात या समाजाला “गुन्हेगार” म्हणून शिक्का लावण्यात आला आणि त्यामुळे शिक्षण, नोकरी यापासून तो समाज दूर गेला. साधारण १९५२ मध्ये हा भेदभावपूर्ण शिक्का रद्द करण्यात आला असला तरी, सामाजिक कलंक आजही कायम आहे. वाखरवाडीत काही पराधी कुटुंबे राहतात. पण काही वर्षांपूर्वी त्यांच्यापैकी एकाही मुलाने शाळेत प्रवेश घेतला नव्हता. दीपक भाऊंच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला, त्या कुटुंबांमध्ये विश्वास निर्माण केला, शिक्षणाचे महत्त्वं त्यांना पटवून दिले आणि यशस्वीरीत्या त्यांच्या मुलांना वर्गात आणले.
“मी त्यांच्याशी पहिल्यांदा बोलायला गेलो तेव्हा त्यांना मराठी भाषाही नीट समजत नव्हती. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, गरिबी आणि अज्ञानामुळे त्यांची मुलं शाळेपासून दूर होती,” दीपक भाऊ म्हणाले. पारधी समाज वेगळा पडल्याने बालविवाह, बालमजुरी, कमी वयात गर्भारपण, कुपोषण आणि पिढ्यानपिढ्यांच्या गरिबीच्या चक्रात अडकला होता. पण निराश न होता, दीपक यांनी दररोज त्यांना भेट द्यायला सुरुवात केली. त्यांचेही म्हणणे, अडचणी, जगण्यातल्या समस्या ऐकून घेतल्याने पारधी समाजालाही दीपकभाऊंबद्दल विश्वास निर्माण झाला. महिनाभर पाठपुरावा केल्यावर नानीबाई शिंदे या समाजातील एक ज्येष्ठ महिला, आपल्या नातवंडांना शाळेत पाठवण्यास तयार झाल्या. “शाळेला खऱ्या अर्थाने सर्वसमावेश बनवण्याच्यादृष्टीने हे आमचं पहिलं यश होतं,” ते अभिमानाने म्हणाले.
दीपक यांना शिक्षण अर्धवट सुटल्याच्या वेदना स्वानुभवातून माहित होत्या. कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे बालपणापासून त्यांनी अथक परिश्रम केले आणि शेवटी वाखरवाडीत एक दुकान उघडले. या दुकानामध्ये स्टेशनरी आणि सजावटीच्या वस्तूंपासून ते साड्या आणि घरगुती गरजेच्या वस्तूंपर्यंत सर्व काही उपलब्ध आहे. आज, ते दुकान केवळ उपजीविकेचे साधन नाही, ते गावच्या सर्वांसाठीच भेटीगाठी, गप्पा, गंभीर चर्चा, उपक्रमांचे आयोजन आणि माहितीचे एक केंद्र आहे.
वाखारवाडीच्या शाळेमध्ये मीना राजू मंचचा कार्यक्रम सुरू झाल्यावर दीपकभाऊंच्या शिक्षण, समाजाविषयीच्या दृष्टीकोनात आणखी बदल झाला. “मला आधीपासूनच शिक्षणावर विश्वास होता. पण मीना राजू मंचने मला एक लिंग समभावाचा वेगळाच दृष्टिकोन दिला आणि माझ्यासाठी अनेक गोष्टी बदलून गेल्या, ” ते म्हणाले. लिंग समभावाच्या विचाराने प्रेरित होऊन, त्यांनी आपली पत्नी सोनाली, हिला घराच्या चौकटीबाहेर पडण्यास प्रोत्साहन दिले. त्यांनी आपल्या मुलींना सांगितले की, “तुम्हाला जे शिकायचे आहे ते शिका, तुम्हाला स्वप्नं पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे.”
महाराष्ट्रातील धाराशिवमध्ये, अंगाई-युनिसेफतर्फे (UNGEI-UNICEF) लिंग समभाव हा विषय खेळाधारित शिक्षणाद्वारे किशोरवयीन मुले-मुली, शिक्षक आणि गावातील समुदायांना २०२२पासून शिकवण्यात आला. मीना राजू मंच हा इयत्ता ६ ते ८ वीचे विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आला असून लिंग समभावाशी संबंधित विविध पैलूंची माहिती त्यांना करून देण्यात आली. त्यामध्ये संवाद, खेळ, चर्चा अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. या कार्यक्रमाला स्थानिक संस्था स्वयं शिक्षण प्रयोग (एसएसपी), कोरो आणि मावा यांचा सहभाग होता.
देशात प्रथमच प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या या उपक्रमात १२० शाळा, ८०० हून अधिक शिक्षक आणि सुमारे १८ हजार विद्यार्थी सहभागी झाले. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘मीना राजू मंच’च्या माध्यमातून लिंग समानतेचे विविध पैलू सुलभ पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले. राज्य शिक्षण विभागाच्या शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात आला.
एकेकाळी डोक्यावर पदर घेणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी क्वचित दिसणाऱ्या त्यांच्या पत्नी सोनाली या थेट ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या. नवऱ्याकडून लोकसेवेचा वसा घेतलेल्या सोनाली यांनी इतर महिलांना घराबाहेर पडण्यास, आपला आवाज उठवण्यास आणि सामाजिक बदलात सहभागी होण्यास सक्षम बनवले. आता त्या स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेतर्फे त्यांच्या गावामध्ये महिला, बालकल्याणे अशा विविध विषयांवर काम करतात आणि लिंग समभावाविषयी सत्रंही घेतात.
दीपक भाऊ आणि सोनाली यांचा प्रवास इथेच थांबला नाही. आईचे छत्रं हरवलेली आणि व्यसनाधीन वडिलांमुळे संगोपनात दुर्लक्ष झालेली एक मुलगी त्यांनी दत्तक घेतली. ही कल्पना दीपक यांच्या आई, कौशल्या शिंदे यांची होती. स्वतः कठीण परिस्थितीचा सामना केलेल्या दीपक आणि सोनाली यांनी तिला आपली तिसरी मुलगी म्हणून कोणत्याही दडपणाशिवाय सहज स्वीकारले आणि कुटुंबाची सदस्य करून टाकले. शिंदे दांपत्याच्या या स्वभावामुळे आज त्यांच्या घरात गावातल्या महिला हक्काने येतात, आपल्या मनातील गोष्टी बोलतात, एकमेकींना समजून घेतात. सुरक्षित चर्चेची ती जणू एक जागाच बनली आहे.
लिंग समभावाचा उपक्रम केवळ शाळेतल्या विद्यार्थ्यांपुरता मर्यादीत न ठेवता दीपकभाऊंनी तो गावातल्या लोकांसाठीही राबवला. त्यात महिला आणि पुरुष अशी विभागणी केली जाणारी कामं त्यांनी दोघांनाही करायला लावली म्हणजे भूमिका-उलटफेर खेळ आयोजित केला. पुरुषांना साड्यांच्या घड्या करणे, भाकरी थापणे आणि साफसफाई करणे अशी कामं करण्यास सांगितलं गेलं. महिलांनी पुरुषांची मक्तेदारी म्हणून समजलं जाणारे सुतारकाम केलं आणि फुटबॉल खेळून दाखवला. या खेळामध्ये सर्वांचा सहभाग असला तरी अनेक पुरुषांना “सोप्या” समजल्या जाणाऱ्या घरगुती कामांमध्ये संघर्ष करावा लागला.”त्या खेळाने अनेकांचे डोळे उघडले. पुरुषांना आपल्या गृहीतकांवर, सवयींवर आणि परंपरागत चालत आलेल्या अनेक भेदभावांवर विचार करण्यास भाग पाडले. तेव्हापासून, आम्हाला गावात अनेक गोष्टींमध्ये खरा बदल दिसतो. आता ग्रामपंचायत सदस्य किंवा शाळा व्यवस्थापन समितीमध्ये महिलांचा सहभाग वाढलाय. त्यांनी नावं केवळ कागदावर नाहीत. आमच्या गावात एकही मूल शाळाबाह्य नाही. सामाजिक बदलाच्या प्रक्रियेमध्ये महिलांचा वाढता सहभाग ही गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे,” ते म्हणाले.
वाखारवाडीतील हा सामाजिक बदल प्रतीकात्मक नाही. त्या भागातल्या इतर गावांसाठी तो प्रेरणादायी आहे. ही सुरुवात लहान असेल पण त्यातून भविष्यामध्ये घडणाऱ्या अनेक बदलांची ती नांदी आहे. दीपक भाऊंनी सुरू केलेले प्रयत्न आज गावातल्या घराघरामध्ये पोहोचले आहेत. त्यांना मदतीचे हात स्वतःहून पुढे येत आहेत. प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात लहान लहान बदलातूंनच होते.
संकलनः श्रुति गणपत्ये, माध्यम सल्लागार, युनिसेफ महाराष्ट्र
छायाचित्रे: फैसल मगरे