उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीं 100 टक्के शुल्क माफ योजनेमुळे एसएनडीटीमध्ये महिला विद्यार्थींनीची संख्या वाढली (फोटो - सोशल मीडिया)
सोनाजी गाढवे : पुणे : राज्य सरकारने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी लागू केलेल्या १०० टक्के शुल्क सवलत योजनेचा परिणाम म्हणून एसएनडीटी महिला विद्यापीठात (SNDT) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांत प्रवेशसंख्या दुपटीपेक्षा अधिक वाढून सध्या सुमारे १ लाख ८ हजार १२३ विद्यार्थिनी विद्यापीठात शिक्षण घेत असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. स्त्री शिक्षणासाठी समर्पित असलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठात विविध पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यापीठाची सहा शैक्षणिक संकुले, ३७ विभाग आणि ३८४ संलग्न महाविद्यालयांद्वारे सुमारे ३०० हून अधिक अभ्यासक्रम राबवले जातात. (Pune News)
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मुलींसाठी मोफत शिक्षण आणि वसतिगृह सुविधा उपलब्ध झाल्याने या संधी खेड्यापाड्यांतील विद्यार्थिनींपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दोन वर्षांपूर्वी मुलींना शुल्क आणि परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे विशेषतः आर्थिकदृष्ट्या मर्यादित कुटुंबांतील विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेणे सोपे झाले असून, प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या काही वर्षांत विद्यापीठाने पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच इंजिनीअरिंग, एमबीए, एमसीए, बीबीए, बीसीए, डेटा सायन्स यांसारखे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. सामान्यतः या अभ्यासक्रमांचे शुल्क जास्त असते मात्र शुल्क सवलतीमुळे विद्यार्थिनींना नाममात्र शुल्कात शिक्षण घेण्याची संधी मिळत असल्याने या अभ्यासक्रमांकडेही विद्यार्थिनींचा कल वाढत आहे.
हे देखील वाचा : नवलच! परीक्षेला बसूनही गैरहजर, वर्ष धोक्यात; विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
डॉ. विलास नांदवडेकर सांगितले की, “प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता, सुलभता आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे अर्ज आणि प्रवेश प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि विश्वासार्ह झाली आहे. प्रशासनाने वेळेत कार्यक्षमतेने काम केल्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडली. तसेच, विद्यार्थिनींना अधिक चांगल्या सुविधा, मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, प्रवेश प्रक्रिया अधिक बळकट आणि सुबक करण्यासाठी कॅम्पसनिहाय अॅडमिशन कमिटी स्थापन करण्यात आली आहे.”
अभ्यास करण्याची गरज
विद्यार्थिनींसाठी शुल्कमाफी योजना राज्यातील सर्व सरकारी विद्यापीठांना लागू असली तरी इतर विद्यापीठांमध्ये प्रवेशसंख्येत अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे एसएनडीटी विद्यापीठात प्रवेशसंख्या वाढण्यामागील कारणांचा स्वतंत्र अभ्यास करण्याची गरज अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
एसएनडीटी महिला विद्यापीठातील प्रवेशसंख्या वाढ
| वर्ष | विद्यार्थ्यांची संख्या |
|---|---|
| 2022-23 | 52 हजार 293 |
| 2023-24 | 61 हजार 834 |
| 2024-25 | 84 हजार 331 |
| 2025-26 | 1 लाख 8 हजार 123 |
हे देखील वाचा : Degreeचे निकष बदलले! ‘या’ महाविद्यालांमध्ये तीन नाही तर चार वर्षांचा अभ्यासक्रम, मार्गदर्शक सूचना जाहीर
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव म्हणाल्या की, “नवीन इनोव्हेटिव्ह प्रोग्राम्स, फॅशन डिझाइनसारखे आधुनिक अभ्यासक्रम आणि कौशल्यविकास केंद्रांच्या स्थापनेमुळे विद्यार्थिनींचा कल वाढत आहे. मुलींसाठी मोफत शिक्षण आणि वसतिगृह सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनाही उच्च शिक्षणाच्या संधी मिळत आहेत.”
एसएनडीटी महिला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर म्हणाले की, “उद्योगाभिमुख व कौशल्याधारित अभ्यासक्रमांची अंमलबजावणी आणि प्रवेश प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर यामुळे विद्यार्थिनींना प्रवेश घेणे सोपे झाले आहे. प्रशासनाच्या नियोजनबद्ध कामकाजामुळे प्रवेशसंख्येत वाढ दिसून येत आहे.”






