फोटो सौजन्य - Social Media
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी महाआयटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली होती. शहर व जिल्ह्यातून एकूण ८,९६५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ७,६३५ अर्ज पात्र ठरले, तर १,३३० अर्ज अपात्र ठरविण्यात आले. पात्र अर्जांपैकी आतापर्यंत ४,५४० अर्ज निकाली काढत विद्यार्थ्यांच्या खात्यात २,२४४.०२ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित ३,६६७ अर्ज प्रलंबित असून त्यासाठी निधी उपलब्धतेची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
नवीन अर्जांबाबत बोलायचे झाल्यास, २०२४-२५ या वर्षात २,२६५ नवीन विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले असून त्यांना १,११४.६८ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. मात्र यामध्ये १,२९७ अर्ज लाभाविना राहिले होते. तसेच नूतनीकरणासाठी ४,०७३ अर्ज पात्र ठरले असून त्यापैकी ५७२ अर्ज अपात्र ठरविण्यात आले. उर्वरित २,२७५ नूतनीकरण लाभार्थ्यांना १,१२९.३४ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. सध्या ५७६ विद्यार्थ्यांची अंतिम यादी तयार झाली असून, आणखी ७०० विद्यार्थ्यांची यादी अंतिम टप्प्यात आहे. या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा केली जाणार आहे.
दरम्यान, स्वाधार योजनेच्या लाभात होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थी आणि विविध संघटनांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक विद्यार्थ्यांना अद्याप स्वाधारचे पैसे मिळालेले नसल्याने तात्काळ रक्कम जमा करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठीचे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय स्तरावरच स्वीकारण्यात यावेत, अशीही मागणी संघटनांनी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, समाज कल्याण विभागाने विद्यार्थ्यांना दिलासा देत महत्त्वाचे आवाहन केले आहे. २०२४-२५ मधील शिल्लक लाभार्थ्यांना येत्या आठ दिवसांत रक्कम जमा होईल. तसेच २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन व नूतनीकरणाचे अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ३१ डिसेंबरपर्यंत संबंधित महाविद्यालयातील शिष्यवृत्ती विभागात जमा करावेत, जेणेकरून लाभ वितरणाची प्रक्रिया लवकर पूर्ण करता येईल, असे वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक सीमा शिंदेकर यांनी सांगितले आहे.






