फोटो सौजन्य - Social Media
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी आयोजित करण्यात आलेल्या बीएड (जनरल, स्पेशल व ईएलसीटी) अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी राज्यभरात सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा तीन सत्रांमध्ये परीक्षा पार पडली. मात्र काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे प्रशासनाला तीन परीक्षा केंद्रांवरील सत्रे पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला. असे असले तरी पहिल्या दिवशी एकूण ८९.१५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली गेली.
ही परीक्षा २७, २८ आणि २९ मार्चदरम्यान राज्यभरातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. यासाठी एकूण १ लाख १० हजार ४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी शुक्रवारी ५४ हजार ०३४ विद्यार्थ्यांची परीक्षा नियोजित होती. सकाळच्या सत्रात २१,५५५ विद्यार्थ्यांपैकी १९,४८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दुपारच्या सत्रात २२,२०० विद्यार्थ्यांपैकी १९,४७९ विद्यार्थी उपस्थित राहिले. तर सायंकाळच्या सत्रात १०,२७९ पैकी ९,१९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या आकडेवारीवरून परीक्षेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट होते.
तांत्रिक अडचणींमुळे परभणी, नांदेड आणि नागपूर येथील तीन केंद्रांवरील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. परभणी येथील एमजीएम अकॅडेमीमध्ये सकाळच्या सत्रादरम्यान शॉर्टसर्किट झाल्याने संपूर्ण यंत्रणा बंद पडली. त्यामुळे तेथील सकाळच्या सत्रातील २९१ आणि दुपारच्या सत्रातील २७८ विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलावी लागली. नांदेड येथील मराठवाडा परीक्षा केंद्रावर तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळच्या सत्रातील ४३० विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. याशिवाय नागपूरमधील एका केंद्रावर दुपारच्या सत्रातील परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली.
राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमधील १६८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जात आहे. काही ठिकाणच्या अडचणी वगळता परीक्षा एकूण सुरळीत पार पडल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या सत्रांसाठी नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.






