‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
ठाणे : सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक, सशक्त महिला आणि आनंदी नागरिक हीच विकासाची खरी व्याख्या असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शेतकरी, कामगार, महिला आणि युवकांची ताकद आधुनिक तंत्रज्ञानासोबत जोडून महाराष्ट्र आणि भारताला जगातील सर्वोत्तम राष्ट्र बनवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी विविध लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा असल्याचे सांगत शिंदे यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांचा उल्लेख केला. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’सह विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यात ९७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक प्रणालीवर नोंदणी केली आहे. आधुनिक शेती साहित्य, सिंचन साधने आणि महिला बचतगटांना ई-कार्टचे वाटप करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
ठाणे अंतर्गत मेट्रो आणि ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा हे प्रकल्प शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे शिंदे म्हणाले. ठाणे आणि अंबरनाथमधील मलनिःसारण प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे.
गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून महाराष्ट्र झोपडपट्टीमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यातील ९०० खाटांचे अत्याधुनिक सिव्हिल हॉस्पिटल याच वर्षी सेवेत आणण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ६ हजार ५९ AI-सक्षम कॅमेरे बसवण्यात येत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आधारवड’ आणि नागरिकांशी संवाद वाढवण्यासाठी ‘पोलीस मित्र’ ॲप सुरू करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
नशामुक्त भारत अभियानांतर्गत ठाणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ नष्ट केल्याची माहितीही त्यांनी दिली.
ध्वजारोहणाचा मान मिळाला, आता पालकमंत्रीपद कधी? भरत गोगावलेंचा मोठा दावा
आजची जेन झी पिढी तंत्रज्ञानस्नेही आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणारी असल्याचे सांगत शिंदे यांनी युवकांना स्टार्टअप, ग्रीन टेक्नॉलॉजी आणि AIच्या माध्यमातून विकासात योगदान देण्याचे आवाहन केले.
यावेळी ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ आणि ‘मृद व जलसंधारण रील्स स्पर्धे’च्या लोगोचे अनावरण करण्यात आले. उपस्थितांना जलसंधारणाची शपथ देण्यात आली. तसेच महिला सक्षमीकरण आणि यशकथांवर आधारित ‘स्त्री दर्पण’ या ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

