‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने
मुंबई : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना ‘दिमागी नक्षलवाद’चा उल्लेख केला. याच मुद्द्यावरून महाराष्ट्रात आता भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसच्या ध्वजारोहण कार्यक्रमातील सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या संवादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला असून, त्यावरून वंदे मातरमच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.
भाजपकडून या व्हिडिओच्या आधारे सोनिया गांधी यांनी संपूर्ण वंदे मातरमला विरोध केल्याचा दावा केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या कार्यक्रमात ‘दिमागी नक्षलवाद’ दिसून आल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
फडणवीसांच्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्युत्तर दिले. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या प्रसंगाचा वंदे मातरमला विरोध करण्याशी संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘नंदुरबारमधील रस्त्यांची अवस्था पाहून लाज वाटली’; हसन मुश्रीफांचा अधिकाऱ्यांना इशारा
मल्लिकार्जुन खर्गे यांना बराच वेळ उभे राहण्यास त्रास होतो. यापूर्वीही त्यांना अशा प्रसंगी त्रास झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे सोनिया गांधी त्यांना खुर्ची देण्याबाबत सूचना करत होत्या, असा दावा सपकाळ यांनी केला.
वंदे मातरम हा काँग्रेसच्या राजकीय आणि ऐतिहासिक परंपरेचा भाग असल्याचे सांगत सपकाळ यांनी भाजपवर पलटवार केला. काँग्रेसच्या अधिवेशनांची सुरुवात वंदे मातरमने होत आली आहे. त्यामुळे भाजप, आरएसएस किंवा इतर संघटनांनी काँग्रेसला वंदे मातरमबाबत शिकवण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले.
सोनिया गांधी यांनी वंदे मातरमला विरोध केल्याचा दावा दिशाभूल करणारा असल्याचेही सपकाळ यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या कार्यक्रमात संपूर्ण वंदे मातरम गायले गेले आणि त्यात कोणताही अडथळा आणला गेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील भाषणावरूनही सपकाळ यांनी प्रश्न उपस्थित केले. गेल्या १२ वर्षांत पंतप्रधानांनी केलेल्या विविध घोषणांपैकी किती प्रत्यक्षात पूर्ण झाल्या, याचा आढावा घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी गेल्या काही वर्षांत अनेक भाषणे केली. मात्र, त्या भाषणांमध्ये केलेल्या आश्वासनांपैकी नेमके काय साध्य झाले, याचा सरकारने हिशोब द्यावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली.
राहुल गांधी लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहळ्याला अनुपस्थित असल्याबाबतही सपकाळ यांनी भूमिका मांडली. सरकारच्या कामगिरीवरील प्रश्नांपासून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी वंदे मातरमसारखे मुद्दे पुढे आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून सशस्त्र नक्षलवादाचा पराभव झाल्याचा दावा करत ‘दिमागी नक्षलवादी’ समाजाची दिशाभूल करण्याच्या प्रयत्नात असल्याचे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर फडणवीस आणि सपकाळ यांच्यातील आरोप-प्रत्यारोपामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

