फोटो सौजन्य - Social Media
इंजिनिअरिंगच्या दुनियेत पाऊल टाकण्याचा पहिला टप्पा अनेक विद्यार्थ्यांसाठी पॉलिटेक्निक कोर्स असतो. १०वी नंतर लगेचच डिप्लोमा इन इंजिनिअरिंग कोर्सेसमध्ये प्रवेश घेता येतो आणि तीन वर्षांच्या या कोर्सनंतर तुम्हाला थेट सरकारी किंवा खासगी क्षेत्रात नोकरीची संधी मिळू शकते. मात्र या कोर्ससाठी योग्य ब्रँच निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, ब्रँच निवडल्यावरच तुमच्या करिअरचा पुढचा मार्ग निश्चित होतो.
खालील पॉलिटेक्निक कोर्सला जास्त मागणी आहे:
कंप्युटर इंजिनिअरिंग : डिजिटल युगात कंप्युटर इंजिनिअरिंग ही सर्वाधिक पसंतीची शाखा ठरते आहे. यात कोडिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, अॅप डिझाइन, वेब डेव्हलपमेंट इत्यादी बाबी शिकवल्या जातात. IT कंपन्या, स्टार्टअप्स आणि सरकारी प्रकल्पांमध्ये या शाखेच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग : मोबाईल नेटवर्क, सॅटेलाइट सिस्टम्स, बायोमेडिकल इक्विपमेंट्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये ही शाखा उपयोगी ठरते. भविष्यातील 5G आणि IoT क्षेत्रात काम करण्यासाठी ही शाखा उत्तम पर्याय आहे.
सिव्हिल इंजिनिअरिंग : इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट क्षेत्रात सदैव मागणी असलेल्या शाखांपैकी एक म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग. रस्ते, पूल, इमारती, जलसंपत्ती यांसारख्या प्रकल्पांमध्ये डिप्लोमा होल्डर्सना चांगली संधी मिळते. सरकारी विभागांमध्येही भरपूर नोकऱ्या उपलब्ध असतात.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग : ही सर्वात जुनी आणि स्थिर क्षेत्र आहे. ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, मेन्टनन्स, पॉवर प्लांट्स आणि औद्योगिक प्रकल्पांमध्ये या शाखेतील विद्यार्थ्यांची कायमच गरज असते.
इंटीरिअर व फॅशन डिझाईन : विशेषतः मुलींमध्ये इंटीरिअर डिझाईन आणि फॅशन डिझाईन हे कोर्स लोकप्रिय होत आहेत. क्रिएटिव्ह क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हे कोर्स योग्य पर्याय आहेत.
पॉलिटेक्निक हा करिअर घडवणारा महत्त्वाचा टप्पा आहे. योग्य ब्रँचची निवड केल्यास कमी वयात चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. त्यामुळे तुमच्या आवडी, क्षमता आणि भविष्यातील मागणी लक्षात घेऊन ब्रँच निवडावी.