फोटो सौजन्य - Social Media
कॉलेज हायरिंग आउटलुक रिपोर्ट-2025 नुसार कंपन्या आता भरती प्रक्रियेमध्ये अधिक सजग आणि काटेकोरपणे निर्णय घेत आहेत. पूर्वी केवळ अर्जाच्या आधारे नोकरी दिली जात होती, पण आता कंपन्या उमेदवारांना इंटर्नशिप, को-ऑप प्रोग्राम्स किंवा ट्रायल असाइनमेंटच्या माध्यमातून तपासत आहेत आणि त्यानंतरच पूर्ण वेळ नोकरीसाठी निवड करत आहेत. त्यामुळे, नोकरीसाठी प्रत्येक संधीला एका ऑडिशनसारखेच समजावे लागते.
या प्रक्रियेतून हे समजते की सध्या कोणते कौशल्ये अधिक मागणीमध्ये आहेत, नियोक्ते नवीन उमेदवारांकडून काय अपेक्षा ठेवतात आणि ते भरतीसाठी कोणत्या नव्या रणनीती वापरत आहेत. म्हणूनच नवीन उमेदवारांनी स्वतःला सातत्याने सादर करणे, नवीन गोष्टी शिकत राहणे आणि बदलत्या कामकाजाच्या पद्धतींनुसार स्वतःला जुळवून घेण्याची मानसिकता ठेवणे आवश्यक आहे.
नियोक्ते आता केवळ तांत्रिक ज्ञानावर भर देत नाहीत, तर आत्मव्यवस्थापन कौशल्ये जसे की लवचिकता, नीतिमत्ता, टीमवर्क आणि संवाद कौशल्य यांचाही गांभीर्याने विचार करत आहेत. अनेक उमेदवार अजूनही फक्त तांत्रिक कौशल्यांवर भर देतात, पण कंपन्या आता दीर्घकालीन, शिकण्याची तयारी असलेल्या आणि जबाबदारीने काम करणाऱ्या व्यावसायिकांना प्राधान्य देत आहेत.
भरती प्रक्रियेत आता तंत्रज्ञान आणि AI चा मोठा वापर होत आहे. हायर व्ह्यूसारख्या प्लॅटफॉर्मवरून व्हिडीओ इंटरव्ह्यू घेतले जात आहेत. तसेच, AI च्या मदतीने रिझ्युमे स्क्रिनिंगपासून इंटरव्ह्यू शेड्युलिंगपर्यंत सर्व काही डिजिटल होत आहे. उमेदवार देखील AI चा वापर करून रिझ्युमे, कव्हर लेटर आणि इंटरव्ह्यूची तयारी करत आहेत. मात्र, शेवटी रिझ्युमेमध्ये तुमची खरी ओळख, प्रामाणिकता आणि व्यावसायिक दृष्टिकोन दिसणं गरजेचं आहे.
नोकरी मिळवण्यासाठी अनुभव एकमेव निकष राहिलेला नाही. करिअरमध्ये ब्रेक घेणारे, नव्याने सुरुवात करणारे किंवा करिअर बदलणारे देखील शिकण्याची तयारी आणि सहकार्याच्या भूमिकेमुळे निवडले जात आहेत. त्यामुळे, रीस्किलिंग आणि अपस्किलिंग वर लक्ष देणे आवश्यक आहे. संप्रेषण कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, समस्यांचे निराकरण, आणि व्यावसायिक वर्तन यावर भर द्या. सतत शिकण्याची तयारी ठेवा, हेच यशाचं गमक आहे.