सौजन्य - सोशळ मिडीया
पाचोड : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज अनेकांना अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दाभरूळ फाट्याजवळ ट्रॅव्हल्सने पुढे जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. रविवारी (दि. २३) सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या या अपघातात ट्रॅव्हल्समधील सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
ट्रक (क्र. आरजे ०२ जीसी ३५९५) छत्रपती संभाजीनगरहून बीडच्या दिशेने जात होता. त्याच दिशेने ट्रॅव्हल्स (क्र. एआर ११ एल ९०२१) प्रवाशांना घेऊन जात होती. दाभरूळ फाट्याजवळ येताच ट्रॅव्हल्स चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॅव्हल्स ट्रकच्या मागील भागावर जोरात आदळली. धडक एवढी जोरदार होती की, ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना मोठा धक्का बसला. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळ उडाला. जखमींचा आक्रोश ऐकून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना वाहनातून बाहेर काढले.
सुभाष ढवळे, सिद्धू हिरवे, मेघराज मस्के आणि देवराव जाधव यांच्यासह अन्य प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर पाचोड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. याप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.
देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; कारची ट्रकला जोरदार धडक
सिहोर येथील कुबेरेश्वर धामच्या दर्शनासाठी जात असलेल्या नागपूरमधील भाविकांच्या कारला मुलताईजवळ भीषण अपघात झाला. भरधाव कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकच्या मागील भागावर आदळल्याने नागपूरच्या तिघांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले. शनिवारी पहाटे बैतूल-नागपूर महामार्गावर हा अपघात घडला. मृतांमध्ये बुटीबोरी येथील दीपक श्यामराव राऊत (वय ५५), पत्नी छाया दीपक राऊत (वय ५१) आणि प्रभा रामकृष्ण करदाते (वय ४८) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये नीता (वय ४०), नैतिक (वय १२), उज्ज्वला मोहन (वय ५२), संगीता (वय ४३) आणि सौरभ (वय ३०) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.






