
ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
वरणगाव : भुसावळ तालुक्यातील फुलगाव ग्रामपंचायत कार्यालयात मासिक बैठकीदरम्यान पगाराचे धनादेश तयार करीत असलेल्या ग्रामसेवकाला शिवीगाळ, धक्काबुक्की करून जीवे मारण्याची तसेच पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी दिल्याची तक्रार वरणगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्यासह उपसरपंच व अन्य व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
फिर्यादीनुसार, संबंधित ग्रामसेवक हे १० मार्च २०२६ पासून फुलगाव ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १०.४५ वाजता ग्रामपंचायतीची मासिक बैठक सुरू असताना ते कार्यालयात पगाराचे धनादेश तयार करीत होते. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र काशीनाथ पाटील यांनी तेथे येऊन धनादेश काढण्याच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ व धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर उपसरपंच सिद्धांत राजेंद्र चौधरी हेही तेथे आले. दोघांनी फिर्यादीसोबत वाद घालत धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. यावेळी पंकज शांताराम चौधरी, गणेश चौधरी व भिमराव पाटील यांनीही शिवीगाळ करून वाद घातल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
चर्चा करून गुन्हा दाखल
घटनेनंतर मानसिक दबावामुळे त्याच दिवशी तक्रार दाखल करता आली नाही. त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर फिर्यादीने ३ सप्टेंबर रोजी वरणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. शासकीय कामात अडथळा आणणे, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध कारवाईची मागणी केली.
हे सुद्धा वाचा : पुण्यात दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा मृत्यू
ग्रामसेवकाने फिर्यादीत काय म्हटले
दरम्यान, महेंद्र पाटील व सिद्धांत चौधरी यांनी गणेश चौधरी याला पेट्रोल आणण्यास सांगितले आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. गणेश चौधरी पेट्रोलची बाटली घेऊन कार्यालयात फिरत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे फिर्यादीने डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांची मदत मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे. ग्रामपंचायतीचे दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कार्यालयातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असताना सिद्धांत चौधरी यांनी लाथ मारल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यानंतर महेंद्र पाटील व त्यांच्यासोबतच्या सचिन शशिकांत पाटील यांनी आपल्याला ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर काढल्याचे फिर्यादीने सांगितले.