संग्रहित फोटो
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील जुन्या सांगवी परिसरात दहीहंडी उत्सवासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा काढताना त्याचा काही भाग अंगावर पडल्याने ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सलमा सलाउद्दीन पठाण असे मृत महिलेचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे जुन्या सांगवी परिसरात हळहळ आणि शोक व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री विघ्नहर्ता मंडळाचा दहीहंडी उत्सव संपल्यानंतर कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम सुरू होते.याचवेळी लोखंडी सांगाड्याचा एक भाग अचानक सलमा यांच्या डोक्यावर कोसळला. या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कुटुंबीयांचा मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार
या घटनेनंतर एक वेगळी बाब समोर आली आहे. मृत महिलेचा मुलगा संबंधित मंडळाशी जोडलेला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे मंडळातील इतर मुलांना किंवा तरुणांना अडचणीचा सामना करावा लागू नये, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. तसेच पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करू नये, अशी विनंतीही कुटुंबीयांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.
लाऊड स्पीकर्स आणि डीजे बंद केले पाहिजेत – बापट
पुण्यात गणेश उत्सवांच्या तोंडावर विद्यानंद बापट यांचं नाव चर्चेत आलं आहे. कारण विद्यानंद बापट यांनी लाऊड स्पीकर्स आणि डीजे बंद केले पाहिजेत अशी रोखठोक आणि परखड भूमिका घेतली आहे. त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यांना मारहाण करण्यात आली. पण यानंतर विद्यानंद बापट यांनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तसंच माझ्यावरचा हल्ला सवंग प्रसिद्धीसाठी करण्यात आल्याचंही ते म्हणाले. डी. जे.च्या लाऊड स्पीकर्सचा आवाज बंद करावा. जर लाऊड स्पीकर लावायचेच असतील ते बंदीस्त सभागृहात ठेवावेत आणि पाहिजे त्या डेसिबलला ते वाजवावेत. जेणेकरुन कुणालाच त्रास होणार नाही. तुम्हाला १०० डेसिबल हवं आहे तर ते आम्हाला १ डेसिबलचं नको आहे असंही बापट म्हणाले. बापट यांच्या भुमिकेमुळे पुण्यात डिजेवरुन वातावरण तापलं आहे.






