‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने तरुणीची फसवणूक; तब्बल 5 लाखांना घातला गंडा
पुणे : राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वर्क फ्रॉर्म होमची संधी असल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी हडपसरमधील तरुणीची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका २२ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी हडपसर भागात राहायला आहे. ३ फेब्रुवारी रोजी चोरट्यांनी तरुणीच्या मोबाईलवर मॅसेज पाठविला. ‘सोशल मिडीयातील व्हिडीओ व जाहिरात तसेच पोस्टला लाईक्स मिळवून दिल्यास प्रत्येकी पसंतीस (रिव्ह्यू) २०५ रुपये दिले जातील, असे आमिष दाखविले. नंतर चोरट्यांनी तरुणीला एक लिंक पाठविली. संबंधित लिंक वेगवेगळ्या ग्रुपला पाठविण्यास सांगितले. ती लिंक पाठविल्यानंतर तरुणीला ९ हजार ५०० रुपये ऑनलाइन दिले. त्यामुळे तरुणीचा विश्वास बसला.
नंतर मात्र, ऑनलाइन काम केल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष दाखवून चोरट्यांनी तिला जाळ्यात ओढले. तसेच, तरुणीने महिनाभरात चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पाच लाख सात हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर तरुणीला परतावा देण्यात आला नाही, तसेच चोरट्यांनी त्यांचे मोबाइल बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे अधिक तपास करत आहेत.
लष्करात भरती करण्याच्या बहाण्याने फसवणूक
गेल्या काही दिवसाखाली महाराष्ट्रातील मुलांना लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवून प्रत्येक उमेदवाराकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेऊन लष्करात नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्या तोतया लष्करी जवानावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिटरी इंटेलिजन्स आणि वन गार्डन पोलीस यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. नितीन बालाजी सुर्यवंशी (रा.मु. पो. हेळंब, तालुका देवणी, जिल्हा लातुर) असे बोगस जवानांचे नाव आहे. याबाबत भरत रमेश महाटे (वय 23, रा. नागराळ, तालुका – मुखेड, जिल्हा नांदेड गोंधळेनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 13 ऑगस्ट 2024 रोजी ते आज रोजी पर्यंत सदर्न कमांड कैंटीन व सब एरीया कैंटीन कॅप परिसर येथे घडला आहे. यामध्ये फिर्यादीची 1 लाख 75 हजारांची फसवणूक करण्यात आली.