
पुण्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, नेमकं कारण काय?
पुणे : येरवडा कारागृहाच्या शेजारील प्रेसच्या जागेत असलेल्या जुन्या बंगल्यात एका १८ वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे्. दरम्यान, तरुणाने आत्महत्या का केली हे समजू शकलेले नाही. साहिल विलास कांबळे (वय १८, रा. धानोरी, विश्रांतवाडी) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पंचशील नगर परिसरात राज्यातील सर्वात मोठे येरवडा कारागृह आहे. कारागृहाच्या शेजारीच प्रिटींग प्रेस आहे. कारागृह विभागाचीच प्रेस आहे. दरम्यान, या जागेतील जुन्या व पडलेल्या बंगल्यात एका मुलाने गळफास घेतल्याचे दिसून आले. ही माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानूसार, घटनेची माहिती येरवडा पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तेव्हा १८ वर्षीय साहिल कांबळे याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला आहे. घटनेची नोंद घेतली असून, तपास सुरू केला आहे. मुलाच्या अंगावर जखमी किंवा असे काही आढळलेले नाही. संशयास्पद आढळलेले नसून, मुलाच्या वडिलांकडे प्राथमिक चौकशी केल्याचे येरवडा पोलिसांनी सांगितले.
पुणे न्यायालय परिसरात गळफास घेऊन एकाची आत्महत्या
गेल्या काही दिवसाखाली कौटुंबिक कारणातून तरुणाने शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातच चिंचेच्या झाडाला गळफास घेवून एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शनिवारी भरदुपारी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. सोहेल येणीघुरे (२८, रा. पाषाण) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सोहेल वेटबिगारी म्हणून काम करतो. पाषाण येथे वास्तव्यास असलेल्या सोहेलचे पत्नीशी वाद झाले. तुझ्याशी घटस्फोट घ्यायचाय, असे म्हणून तो पत्नी आणि दोन लहानग्या मुलांना घेवून शिवाजीनगर न्यायालयात आला. शनिवार असल्याने न्यायालयाला सुट्टी होती. त्यामुळे आवारात कोणी नव्हते. तेथे आल्यानंतर पती – पत्नीत पुन्हा वाद झाला. त्यातून सोहेलने पत्नीची ओढणी घेत चिंचेच्या झाडावर चढून गळफास घेतला. शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.