पबमध्ये डान्स करताना तरुणींना धक्का; महिला बाऊन्सरलाही शिवीगाळ; नेमकं काय घडलं?
पुणे : पबमध्ये नृत्य करताना शेजारील तरुणीना धक्का दिल्यानंतर महिला बाऊन्सरने दोघांना बाजूला घेत असताना त्यांनी शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. येरवडा परिसरातील एका पबमध्ये ही घटना घडली असून, याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश दादाभाऊ घावटे (वय ३४, रा. मु. पो. अण्णापूर, ता. शिरुर) आणि यश कोतवाल (रा. कोरेगाव भीमा, ता. शिरुर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ३२ वर्षीय महिला बाऊन्सरने येरवडा पोलिसांत तक्रार दिली आहे. ही घटना येरवड्यातील एका मॉलमधील पबमध्ये शनिवारी रात्री घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, येरवड्यातील पबमध्ये शनिवारी रात्री डान्स फ्लोअरवर तरुण-तरुणी डान्स करत होते. तेव्हा हे दोघेही त्याठिकाणी डान्स करत होते. डान्स करताना बाजूच्या तरुणीला धक्का बसला. त्यांच्या डान्समुळे इतरांना धक्का बसत असल्याचे पाहून महिला बाऊन्सरने दोघांना बाजूला डान्स करण्यास सांगितले. यावेळी दोघांनी महिला बाऊन्सरशी वाद घालत त्यांना शिवीगाळ करुन विनयभंग केला. दोघांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावली असून, सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले तपास करत आहेत.
महिलेला मारहाण करुन अश्लील छायाचित्रे पाठविली
एका महिलेला मारहाण करुन तिच्या बहिणीच्या मोबाइलवर अश्लील छायाचित्रे पाठविणाऱ्या एकावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. माहिती-तंत्रज्ञान कायदा, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्याान्वये गुन्हा दाखल केला. आरोपीने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अश्विनी ननावरे तपास करत आहेत.
अश्लील संभाषण प्रकरणी एकावर गुन्हा
महिलेचा मोबाइल क्रमांक मिळवून तिच्याशी अश्लील संभाषण केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एकावर गु्न्हा दाखल केला. याबाबत महिलेने लोणीकंद पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या घराशेजारी आरोपी राहायला आहे. त्याने महिलेचा मोबाइल क्रमांक मिळविला. नंतर त्याने महिलेच्या मोबाइलवर वेळोवेळी संपर्क साधून तिच्याशी अश्लील संभाषण केले. गेल्या नऊ महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. आरोपीच्या त्रासामुळे अखेर महिलेने पोलिसंकडे तक्रार दिली.