कोयतेधारी टोळक्याचा राडा; पुण्यातील 'या' भागात वाहनांची तोडफोड
पुणे : पुणे शहरात दहशत माजविण्यासाठी होणाऱ्या वाहन तोडफोडीच्या घटना अधून-मधून सुरूच असल्याचे दिसत असून, खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयतेधारी टोळक्याने वाहनांची तोडफोड करून दहशत माजविली आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पाटील इस्टेट भागातील महात्मा गांधी वसाहतीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी राजजूनी फौजानसिंग याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सय्यद नूरजहाँ इराणी (वय ५६, रा. महात्मा गांधी वसाहत, पाटील इस्टेट) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी टोळके हे गुंड प्रवृत्तीचे आहे. राजजूनी व टोळके बुधवारी रात्री महात्मा गांधी वसाहतीत शिरले. त्यांनी हातात कोयते घेऊन परिसरात गोंधळ घातला. मोठ-मोठ्याने आरडाओरडा करत शिवीगाळ केली. यानंतर दहशत माजवून वसाहतीत लावलेल्या तीन ते चार दुचाकींची तोडफोड केली. तोडफोडीनंतर हवेत कोयते फिरवून पुन्हा दहशत माजवून टोळके पसार झाले.
दरम्यान, याघटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी येथे धाव घेतली. परंतु, तोपर्यंत आरोपी पसार झाले. या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत. शहरात वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविण्याच्या घटना अधून-मधून घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी येरवड्यात कोयते उगारुन दहशत माजविली होती. नागरिकांच्या घरावर कोयते आपटून आरोपी पसार झाले होते. तर, चतु:श्रृंगी परिसरात देखील तोडफोड झाल्याचे समजते.