
सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला
नागपूर : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून एका मुलाने स्वतःच्या आईवर चाकूने हल्ला करून तिच्या हत्येचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना जगन्नाथ परिसरातील कुंभारपुरा येथील शिवभोजन थाळी केंद्रात सोमवारी (दि.21) घडली. आईवर पुन्हा वार करण्यापूर्वी तिच्या सहकारी महिलेने धाडस दाखवत आरोपीच्या हातातील चाकू हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
याप्रकरणी तहसील पोलिसांनी आरोपी मुलगा सचिन सुरेश टाकळीकर (वय ४२) याच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिनविरुद्ध हत्या, मारहाण तसेच घातक शस्त्राने हल्ला करण्यासह ७ गुन्हे दाखल आहेत. त्याने सुमारे १६ वर्षांची कारावासाची शिक्षा भोगली असून, काही काळापूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता. त्याला दारूचे व्यसन आहे. लीलाबाई या कुंभारपुरा येथील शिवभोजन थाळी केंद्रात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
Crime News : यूएईत भारतीयाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे नऊ तुकडे करून बॅगमध्ये भरले अन्…
सोमवारी नेहमीप्रमाणे त्या कामावर असताना त्यांचा मुलगा सचिन तेथे आला. त्याने दारू पिण्यासाठी आईकडे पैशांची मागणी केली. मात्र, लीलाबाईंनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे सचिनने त्यांच्याशी शिवीगाळ सुरू केली. याच दरम्यान सचिनने जीवे मारण्याची धमकी देत केंद्रात ठेवलेला भाजी कापण्याचा चाकू उचलला आणि आईच्या पोटावर वार केला. घटनेच्या वेळी शिवभोजन केंद्रात ग्राहक तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे केंद्रात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सहकारी महिला पुढे आली अन् पुढील अनर्थ टळला
सचिन पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत असतानाच लीलाबाईंची सहकारी ललिता हेमंत निमजे यांनी मध्ये पडून त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेतला. त्यामुळे लीलाबाईंचा जीव वाचला. सचिन घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सचिनला अटक केली.