उधारीवर दारू न दिल्याने वाईन शॉपीची तोडफोड; कामगारावरही केले वार
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येरवड्यात उधारीवर दारू न दिल्याने एका वाईन शॉपच्या काचा फोडून तीक्ष्ण हत्यार फेकून मारत तुफान राडा घालण्यात आल्याची घटना घडली आहे. फेकलेल्या तीक्ष्ण हत्याराने एक कामगार गंभीररित्या जखमी देखील झाला. रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला असून, याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
रोहित पिल्ले (वय २५, रा. जयजवानगर, लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. श्रीकांत तानाजी राजगुरु (वय ३८, रा. आझाद आळी, येरवडा गावठाण) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या मारहाणीत वाईन शॉपमधील कामगार करण संतोष आहुजा (वय २८) हे जखमी झाले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, येरवडा भागातील वाईन शॉपमध्ये पिल्ले रविवारी (१५ जून) रात्री नऊच्या सुमारास आला. त्याने उधारीवर दारूची बाटली मागितली. वाईन शॉपमधील कामगार आहुजा याने दारू देण्यास नकार दिला. त्याचा राग पिल्ले याला आला. तो चिडला. त्याने हातातील हत्याराने दुकानातील गल्ल्याजवळील काच फोडली. नंतर तीक्ष्ण हत्यार दुकानात फेकून मारले. यात आहुजा हे गंभीर जखमी झाले. त्यांना मारहाणदेखील केली. मारहाणीत आहुजा यांचा दात पडला. अधिक तपास सहायक निरीक्षक सावंत करत आहेत.