Drugs News: तरुणाई नशेत डुबली! पुण्यातल्या युवकाने 15 दिवसांत चक्क 5 लाखांच्या MD ड्रग्जचे....
पुणे/ अक्षय फाटक : वय वर्षे अवघे वीस… दहावीनंतर त्याची शिक्षणाची वाट सुटली… साथ-संगत अन् परिस्थितीने तो गुन्हेगारीकडे वळला… विशेष करून तो घरफोड्या अन् चोऱ्या करायचा… आपसूकच गुन्हेगारीतून तो नशेच्या विळख्यातही गेला… त्याला ड्रग्जची (मेफेड्रोन) सवय लागली… नुकतेच त्याने एकाठिकाणी घरफोडी केली आणि चोरीच्या पैशांमधून नशेचे ‘ढोस’ घेतल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, एका दिवसात तो एमडीचे ५ इंजेक्शन घेऊन नशेची भूक भागवत होता. पुण्यातील या भयावह वास्तवाने पोलीस देखील हैराण झाले असून, विशीतल्या या तरुणाची स्थिती पाहिल्यानंतर पोलिसांचे मन देखील हेलावून गेले आहे. दुसरीकडे या ड्रग्ज प्रकरणाने शहरातील नशेचे जाळे किती घट्ट झाले आहे, हेही उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुण हडपसर भागातील रहिवाशी आहे. तो अवघा २० वर्षांचा आहे. त्याचा विवाह देखील झालेला आहे. दरम्यान, सर्व प्रशासकीय इमारती, कार्यालये व उच्चभ्रू असलेल्या परिसरात नुकतीच घरफोडीची घटना घडली होती. याघटनेत १६ लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी गुन्हा नोंद होता. तपास करताना पोलिसांना हा गुन्हा संबंधित तरुणाने केल्याची माहिती मिळाली. त्यानूसार पोलिसांनी शोध घेऊन त्याला पकडलेही. मात्र, त्याला पकडल्यानंतर तो नशेत धुत असल्याचे लक्षात आले आणि तेथून पुढे या नशेची कहाणी पोलिसांच्या तपासातून समोर आली.
पोलिसांनी तरुणाकडे विचारपूस सुरू केली. तेव्हा चोरलेले १६ लाखांचे दागिने या तरुणाने एका सराफाला विकल्याचे सांगितले. सराफाने देखील त्याला फसवत अवघे ६ लाख रुपयेच दिले. या पैशांतून त्याने ड्रग्जचे (एमडी) ढोस घेतले. अवघ्या २० दिवसात या तरुणाने ५ लाखाहून अधिक रक्कम एमडीवर खर्च केली. एका दिवसात तो पाच ते सहावेळा इंजेक्शनमधून ड्रग्ज घेत होता. त्याचा हात पाहिल्यानंतर पोलिसांच्या अंगावरच शहारे उभा राहिले. पोलिसांनाच दोन दिवस त्याला नशेतून पुर्ण बाहेर येण्याची वाट पहावी लागली.
हे सुद्धा वाचा : सांगली अन् कोल्हापुरातील शेकडो महिलांची फसवणूक; तब्बल 86 लाखांना घातला गंडा
हा तरुण काही वर्षांपासून नशा करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मुंबईतील एका मित्राच्या संगतीत राहून तो एमडीची नशा करू लागला. मुंबईवरून तो एमडी घेत होता. नंतर त्याला पुण्यातच एमडी मिळण्यास सुरूवात झाली. या २० दिवसात त्याला पुण्यातीलच एका भागातून एमडी मिळाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. पोलीस आता या घरफोडीच्या गुन्ह्यासोबतच त्या ड्रग्ज तस्काराचा शोध घेत आहेत. मात्र, पुण्यातील ड्रग्जची पाळेमुळे किती खोलवर रूजली आहेत, याचे वास्तव आणखी एका घटनेवरून समोर आले आहे. नशेबाजांना ड्रग्जचा होणारा पुरवठा बंद नसल्याचे देखील दिसत आहे.