संग्रहित फोटो
सांगली : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील शेकडो महिलांना गंडा घालून एका गृहोद्योग कंपनीने फसवणूक केल्याचे समाेर आले आहे. गुरुकृपा महिला गृह उद्योग कंपनी असे तिचे नाव असून दोन संचालकावर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. धाराशिव जिल्ह्यातील एका या कंपनीच्या नावावर ८६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आहे.
लक्ष्मण दुर्गाप्पा बंडगर (वय ३१, सध्या रा. रामकृष्ण परमहंस सोसायटी, १०० फुटी रस्ता, सांगली, मुळ रा. कास्ती खुर्द, ता. लोहारा, जि. धाराशिव) आणि त्याची पत्नी कविता लक्ष्मण बंडगर उर्फ कविता राजकुमार शिंदे (वय २५, मुळ रा. सोन्याळ, ता. जत, जि. सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात चंद्रकांत महादेव कडोले (वय ५९, रा. प्रगती कॉलनी, सांगली) यांनी पोलिसांत धाव घेतली.
बंडगर दाम्पत्याने सांगलीत काही महिन्यांपूर्वी गुरुकृपा महिला गृह उद्योग नावाने कंपनी सुरू केली होती. सांगली, मिरज, तासगाव, पलूस तालुक्यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांत कंपनीचे ग्राहक तयार केले. सुमारे दीड ते दोन हजार लोकांना सभासद करून घेतले. सभासद होण्यासाठी महिलांकडून १० हजार रुपये अनामत भरून घेतली. त्यातून त्यांना चटणी पँकिंग करण्याचे काम देण्यात आले होते.
काही दिवसांनी हे काम बंद करून उद्योगाने अचानकपणे गाशा गुंडाळला. हे लक्षात येताच पैसे भरलेल्या सभासद महिलांनी अनामतीची १० हजार रुपये रक्कम परत करण्यासाठी बंडगर दाम्पत्याकडे तगादा लावला. पण सध्या दोघेही ८६ लाख २८ हजार ५०० रुपये घेऊन गायब झाले आहेत. त्यांनी सभासद महिलांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.
हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; ‘या’ भागातून रोकड अन् सोनसाखळी हिसकावले
पैसे परत मिळणार का?
छोटा-मोठा व्यवसाय करुन चार पैसे मिळवावेत आणि संसाराला हातभार लागावा, या अपेक्षेने अपेक्षा बाळगून महिलांनी पैसे गुंतविले. बंडगर दांपत्याने त्यांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत त्यांची फसवणूक केली. पोलिसांनी संशयितांना पकडले, तरी महिलांचे पैसे परत मिळणार का? असा सवाल फसवणूक झालेल्या महिलांतून उपस्थित केला जात आहे.
कारवाईची भीती दाखवून २३ लाखांची फसवणूक
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली काळ्या पैसे व्यवहारात कारवाईची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी तरुणाला २३ लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर विमानतळ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार तरुण लोहगाव भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी त्याला मोबाइलद्वारे संपर्क केला. काळ्या पैसे व्यवहारात मुंबई गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यात तुमचे नाव असून, अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील, अशी भीती दाखवून चोरट्यांनी तरुणाला तातडीने पैसे भरण्यास सांगितले. ऑनलाइन पद्धतीने तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. तरुणाची २३ लाख रुपयांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली.