भरधाव डंपर राँग साईडला घुसला अन् पुढे जे घडलं ते…
पुणे : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून अपघाताची एक बातमी समोर आली आहे. विरुद्ध दिशेने आलेल्या (राँग साईड) भरधाव डंपरने धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येरवडा भागातील शास्त्रीनगर ते गुंजन चित्रपटगृह रस्त्यावर रविवारी हा अपघात घडला आहे. याप्रकरणी डंपरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तन्वीर आलमयार खान (वय ३१, रा. निओ सिटी, बकोरी फाटा, वाघोली, नगर रस्ता) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी डंपरचालक अमिल रामसिरीठ सिंग (वय ४६, रा. शास्त्रीनगर, येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आत्ता यार खान (वय ३४, रा. निओ सिटी, बकोरी फाटा, वाघोली, नगर रस्ता) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, डंपरचालक सिंग रविवारी (१ जून) येरवड्यातील शास्त्रीनगर चौकातून विरुद्ध दिशेने गुंजन चित्रपटगृहाकडे निघाला होता. सकाळी साडेदहाच्या सुमारास नगर रस्त्याने निघालेल्या दुचाकीस्वार तन्वीर याला विरुद्ध दिशेने आलेल्या डंपरने धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार तन्वीरचा जागीच मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक केकाण करत आहेत.
हे सुद्धा वाचा : गुंड गजा मारणेला मदत करणं भोवलं; ‘त्या’ साथीदाराच्या अडचणी वाढल्या
डंपरचालकांची मुजोरी
शहरात गेल्या काहीच दिवसात भरधाव डंपरच्या वेगवेगळ्या अपघातात तिघांचे मृत्यू झाले आहेत. डंपरचालकाच्या बेदकारपणा आणि मुजोरीमुळे गंभीर स्वरुपांच्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बेशिस्त डंपरचालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. शहरात अवजड वाहनांना बंदी घातली आहे. अवजड वाहतूक बंदी आदेश डंपरचालक झुगारत असल्याचे दिसून येत आहे.