संग्रहित फोटो
पुणे : कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेताना वाटेत झालेल्या मटण बिर्याणीच्या पार्टीवेळी त्याला पैशांसह विविध प्रकारची मदत करणाऱ्याच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी हा आदेश दिला आहे. विशाल विलास धुमाळ (वय ३८, रा. राजेंद्र नगर) असे पोलीस कोठडी वाढविलेल्या आरोपीचे नाव आहे.
कोथरूड येथील आयटी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गजानन मारणे याच्यासह रुपेश मारणे, ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ, अमोल विनायक तापकीर (सर्व रा. शास्त्रीनगर, कोथरूड) आणि बाब्या उर्फ श्रीकांत संभाजी पवार (रा. वडगाव रासाई, शिरूर) या सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली होती. या गुन्ह्यात गजा मारणेला सांगली कारागृहात नेताना वाटेत ढाब्यावर मटण बिर्याणी खाऊ घालणारा बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते आणि आर्थिक मदत करणारा विशाल धुमाळ यांच्यावरही याच प्रकरणात मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात रुपेश मारणे व बाब्या पवार यांच्यासह अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
गुन्ह्यात विशाल धुमाळला २९ मे रोजी अटक केली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने धुमाळला सोमवारी दुपारी विशेष न्यायालयात हजर केले. न्यायालयीन कोठडीत असलेल्या गजा मारणेला त्याच्यासह आणखी कोणी मदत केली, कोणाच्या सांगण्यावरून केली, याबाबत आरोपीची चौकशी करायची आहे. मारणेला पुण्यातून सांगली मध्यवर्ती कारागृहात नेणाऱ्या पोलिसांच्या वाहनांचा पाठलाग करणाऱ्यांची दुचाकी व चारचाकी वाहने जप्त करायची आहेत. विशाल धुमाळने संघटित गुन्हेगारी करून बेकायदा मार्गाने मिळविलेल्या मालमत्तेबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
हे सुद्धा वाचा : चोर टोळीचा गाझियाबाद ते पुणे विमानप्रवास; पोलिसांनी ठोकल्या बेड्या