
पुण्यात 'हिट अँड रन', 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; दाम्पत्य गंभीर जखमी
पुणे : दारू पिऊन भरधाव वेगात कार चालवून रस्त्याच्या कडेला उभारलेल्या चारचाकी तसेच दुचाकींना उडवून झालेल्या भीषण अपघातात एका चार वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर, दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या चालकाला पळून जाताना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा अपघात शनिवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास झाला आहे. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
यशराज निलेश कांबळे (रा. धायरी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर, त्याचे वडिल निलेश अरूण कांबळे (वय ३६) व आई असे गंभीररित्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी नांदेडसिटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी कार चालक अमोल गोरक्षनाथ गेगडे (वय ३२, रा. अहिल्यानगर) याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निलेश कांबळे यांचा भाजी विक्रीचा व्यावसाय आहे. ते धायरी तसेच खडकवासला परिसरात भाजीचा स्टॉल लावत असत. दरम्यान, आरोपी अमोल हा दारू पिऊन त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगात चालवत खडकवासलाकडून पुण्याच्या दिशेने येत होता. शनिवारी (१६ मे) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तक्रारदार त्यांच्या दुचाकीवरून मुलगा यशराज तसेच पत्नीला घेऊन जात होते. तेव्हा खडकवासला भाजी मंडईजवळील बसस्टॉपसमोर पाठिमागून आलेल्या अमोल याने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यापुर्वी त्याने रस्त्याच्या कडेला उभारलेल्या चारचाकींसह दुचाकींना उडविले. नंतर त्याने कांबळे यांच्या दुचाकीला उडविले. तरीही तो न थांबता पुढे जाऊन आणखी दोन वाहनांना धडकला. त्यानंतर नागरिकांनीच या कारचा पाठलाग सुरू केला.
हे सुद्धा वाचा : सोलापुरात भीषण अपघात! कार-हायवा धडकेत ५ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू
दरम्यान, ऐन वर्दळीच्या वेळीच झालेल्या या अपघातामुळे परिसरात चांगलाच गोंधळ उडाला होता. नागरिकांनी आरडा-ओरडा सुरू केला. अचानक गोंधळ झाल्याने मोठी गर्दी देखील जमा झाली. भरधाव कार थांबल्यानंतर नागरिकांनी या मद्यपी चालक अमोल याला पकडले. तसेच नांदेडसिटी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पथकाने येथे धाव घेतली. त्याला ताब्यात घेतले. त्याने मद्य पिल्याचे दिसून आले. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, कांबळे यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर दाम्पत्य व त्यांचा मुलगा यशराज हे खाली पडले. यात यशराज हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास उपनिरीक्षक कसबे हे करत आहेत.