
Image
अकोला : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करताना तगादा लावू नये, असे राज्य सरकारकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले असतानाही फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांना त्रास दिला जात असल्याचे आरोप समोर येत आहेत. अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव येथील अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डोंगरगाव येथील शेतकरी नागापुरे यांनी त्यांच्या पत्नीच्या नावावर शेतीसाठी दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाचे त्यांनी नियमितपणे १३ हप्ते भरल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सध्या पाण्याअभावी शेती संकटात सापडल्याने पुढील हप्ते भरणे शक्य होत नसल्याचे नागापुरे यांनी सांगितले.
कर्जाचा पुढील हप्ता भरता न आल्याने फायनान्स कंपनीचे कर्मचारी त्यांच्या घरी येऊन कर्जफेडीसाठी तगादा लावत असल्याचा आरोप नागापुरे यांनी केला आहे. त्यामुळे कर्जाच्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला आणखी मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या घटनेत फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पत्नीचा फोटो काढून नेल्याचा गंभीर आरोपही नागापुरे यांनी केला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. राज्य सरकारने कर्जवसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, असे निर्देश दिले असताना प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होते आहे का, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. संबंधित फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नेमकी कोणती कारवाई केली आणि त्यामागील कारण काय होते, याची चौकशी होणे आवश्यक आहे.