फोटो - सोशल मीडिया
सावंतवाडी : जंगलामध्ये अमेरिकन महिला आढळल्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली. सोनुर्ली-रोणापाल सीमेवरील घनदाट जंगलामध्ये परदेशी महिलेला साखळदंड्यामध्ये बांधून ठेवलेले दिसले. गुराख्यांना महिलेचा आवाज आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. मात्र एरव्ही या भागामध्ये कोणीही फिरकत नसल्यामुळे असा प्रकार कसा घडला याबाबत सर्वांच्या मनामध्ये उत्सुकता होती. सदर महिला बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नसली तरी तिने दिलेल्या जबाबानुसार तिच्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आता या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. अमेरिकन महिलेने स्वतःच हा बनाव केला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सावंतवाडी रोणापाल-सोनुर्ले येथील घनदाट जंगलात ही अमेरिकन महिला जुलै महिन्याच्या अखेरीस सापडली होती. ललिता कायी कुमार एस असे तिचे नाव असल्याचे जवळील सामानावरुन लक्षात आले. यावेळी ती बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्यामुळे तिला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. साखळदंडांनी ती झाडाला बांधलेली असल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वेगाने तपास सुरु करण्यात आला. रुग्णालयामध्ये काही काळानंतर तिने दिलेल्या जबाबावरून तिच्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करत तपास सुरु करण्यात आला. मात्र पोलिसांच्या तपासामध्ये अशी कोणतीच व्यक्ती नसल्याचे आढळून आले.
रत्नागिरीतल्या मनोरुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. तर तिने तिचा नवरा तामिळनाडूत असल्याचे सांगितले. रुग्णालयामध्ये तिची कसून चौकशी सुरु असताना धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांना संशय आल्याने सदर अमेरिकन महिलेची सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीअंती महिलेने तिची चूक कबुल केली आणि खरे ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
नेमकं घडलं काय?
ललिता या अमेरिकन महिलेने दिलेल्या कबुलीनुसार, ललिता कुमार ही मूळची अमेरिकेची असून ती योग शिक्षिका आहे. काही काळापासून ललिता भारतात वास्तव्यास होती. विझाची मुदत संपल्याने व अमेरिकेतून पुरेसे पैसे येत नसल्याने तणावातून जीवन संपवण्यासाठी आपण स्वतःला बांधून घेतल्याची कबूली दिली. याबाबत मनोरुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकिय अधिकाऱ्याला माहिती दिली. बांदा पोलिसांनी सुद्धा या संदर्भातील जवाब पुर्ण केला आहे. पैसे नसल्याने जीवन संपवण्यासाठी तिने हे पाऊल उचललं. जंगलात उपाशी राहून ती मृत्यूची वाट पहात होती, अशी कबुली ललिताने दिली आहे. या जबाबामुळे हे प्रकरण चर्चेत आले असून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केल आहे.